(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Bypoll Election : 3 वाजेपर्यंत वेळ आहे, तुम्ही फक्त सांगा; टिळकांना उमेदवारी देतो हेमंत रासनेंचा अर्ज मागे घेतो: चंद्रशेखर बावनकुळे
Pune Bypoll election : आज तीन वाजेपर्यंत कसबा-चिंचवड मतदार संघाची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला तर आम्ही लगेच हेमंत रासने यांचा अर्ज मागे घेतो आणि टिळक कुटुंबात उमेदवारी देतो, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
Pune Bypoll Election : टिळक कुटुंबात (Kasba Bypoll Election) उमेदवारी दिली असती तर निवडणूक बिनविरोध करू असं नाना पटोले म्हणाले. पटोलेंनी जर आज तीन वाजेपर्यंत कसबा-चिंचवड मतदार संघाची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला तर आम्ही लगेच हेमंत रासने यांचा अर्ज मागे घेतो आणि टिळक कुटुंबात उमेदवारी देतो, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी महाविकास आघाडीला दिले आहे. आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
टिळक कुटुंबियांना उमेदवारी न दिल्याने महाविकास आघाडीकडून भाजपवर टीका केली जात आहे. नाना पटोलेंनी देखील भाजपच्या या निर्णयावर टीका केली आहे. त्यानंतर टिळक कुटुंबीय नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल (6फेब्रुवारी) रात्री उशीरा केसरी वाड्यात जाऊन टिळक कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी त्यांची नाराजी दूर करण्यासाठी बावनकुळे गेले अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यानंतर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे कसबा विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट बघायला मिळाला. ते म्हणाले की, आज 3 वाजेपर्यंत महाविकास आघाडीने जर ही निवडणूक बिनविरोध केली तर आम्ही रासने यांची उमेदवारी अर्ज मागे घेऊ आणि टिळक कुटुंबियांना उमेदवारी देऊ. नाना पटोले यांन विनंती आहे की ही निवडणूक लढू नये, एक वर्ष लोकांना निवडणुकीसाठी पाठवू नये. अंधेरी पोटनिवडणुकीच्या वेळी शरद पवारांच्या एका फोनमुळे आम्ही उमेदवार मागे घेतले होते. त्यामुळे अजूनही तीन वाजेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे योग्य तो निर्णय घ्या, असं बावनकुळे म्हणाले आहेत.
... तर आभार मानू!
अंधेरी निवडणुकीच्या वेळी भाजपने थेट अर्ज मागे घेतले होते. त्यावेळी शरद पवारांचा फोन आला होता. आम्हीदेखील मागील दोन दिवस झाले महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना फोन केले आहेत. निवडणूक बिनविरोध करा, असं आवाहन आम्ही सगळ्या नेत्यांना केलं आहे. नाना पटोले यांना देखील चार फोन केले आहेत. मात्र आमचा फोन होऊ शकला नाही तीन वाजेपर्यंत अजूनही ते अर्ज मागे घेऊ शकतात, असंंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. अंधेरीत जसं झालं तसे कसबा निवडणुकीत झाले तर आम्ही शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांचे जाहीर आभार व्यक्त करू, असंही ते म्हणाले.
बिनविरोध होणार का?
निवडणूक बिनविरोध होणार नाही, अशी ठाम भूमिका आतापर्यंत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली आहे. त्यांनी कसब्यात कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकरांना उमेदवारी घोषित केली आहे तर चिंचवडमध्ये आज राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र तीन वाजेपर्यंत नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.