Baramati News : बारामती तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणी द्या, विजय शिवतारेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बारामती (Baramati) तालुक्यातील दुष्काळी गावातील लोकांना जानाई शिरसाई योजनेतून पाणी द्यावे, अशी मागणी माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
Baramati News : बारामती (Baramati) तालुक्यातील 69 दुष्काळी गावातील लोकांना जानाई शिरसाई योजनेतून पाणी द्यावे, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्रही शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. शिवतारे हे दोन दिवसीय बारामती तालुक्यातील दुष्काळी (drought) गावांच्या गावभेट दौऱ्यावर होते. मात्र, दौरा करत असतानाच त्यांची मुंबईत बैठक लागल्यामुळं त्यांना जावे लागले. बैठक झाल्यानंतर शिवतारेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत ही मागणी केली.
शिवतारेंनी नेमकं पत्रात काय म्हटलंय?
बारामती तालुक्यातील सुपे, कुतवळवाडी, बोरकरवाडी, राजबाग, भोंडवेवाडी, आंबी खुर्द खंडूखैरेवाडी, मांगोबावाडी, चांदगुडेवाडी, वढाने, दंडवाडी, पानसरेवाडी, काळखैरवाडी, नारोळी, कोळोली, देऊळगाव रसाळ, खोर, उंडवडी सुपे, जराडवाडी, उंडवडी क.प. सोनवडी, सुपे, बऱ्हाणपूर, गोजूबावी, कारखेल, जळगाव सुपे, अंजनगाव, साबळेवाडी, शिर्सुफळ गाडीखेल इत्यादी गावे ही जनाई शिरसाई योजनेच्या लाभक्षेत्रात समाविष्ट असल्याचे विजय शिवतारेंनी पत्रात म्हटले आहे. या गावांसाठी 3.47 टीएमसी पाणी खडाकवासला धरण श्रृंखलेत राखीव आहे. दुर्दैवाने हा प्रकल्प सुरु झाल्यापासून आजतागायत पूर्ण क्षमतेने पाणी उचलण्यात आले नाही. मंजूर क्षमतेच्या केवळ 20 ते 30 टक्के पाणी उचलण्यात आजपर्यंत जलसंपदा विभागाला यश आल्याचे शिवतारे यांनी निदर्शनास आणून दिले.
दुष्काळी भागातील शेतकरी पाण्यापासून वंचित
महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात बंद जलवाहिनीद्वारे पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. बंद जलवाहिनी केली तरी निर्धारित पाणीसाठा उचलण्यात यश न आल्यास या गावांना त्याचा उपयोग होणार नसल्याचे शिवतारे म्हणाले. मधल्या काळात शेतकऱ्यांना 19 टक्के दराने पाणी देण्याचा क्रांतिकारक निर्णय आपण घेतला पण पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध नसल्यानं येथील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. यात गंभीर बाब म्हणजे ज्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी वाटपाचं नियोजन केले जाते त्या बैठकीत या योजनेच्या अधिकाऱ्यांना बोलावले देखील जात नसल्याचा आरोप विजय शिवतारेंनी पत्रात केला आहे. साखर कारखाने आणि पाणीवापर संस्थेच्या प्रतिनिधींना बोलावून पाण्याचे वाटप केले जाते. पण या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना त्यापासून वंचित ठेवले जात असल्याचे शिवतारेंनी म्हटलं आहे. त्यामुळं अशा प्रकल्पांना पाणी वाटपात प्राधान्य देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांसह उच्चस्तरीय बैठक घेऊन यावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी पत्राद्वारे शिवतारेंनी केली आहे. त्यामुळं आता या भागातील लोकांना तात्काळ पाणी मिळणार का? हा खरा प्रश्न आहे.
शिवतारेंची मागणी पूर्ण होणार का?
बारामती तालुक्यातील 40 गावांचा पाणी प्रश्न हा निवडणुकीचा प्रचाराचा मुख्य विषय असतो. गेली अनेक वर्ष पवार या भागाचे नेतृत्व करतात. परंतु, आजपर्यंत या भागाला पाणी का दिले नाही? असा सवाल विरोधक पवारांना विचारतात. मात्र, जे लोकं विरोध करतात ते निवडणुकीपुरता विरोध करतात आणि निवडणूक झाली की निघून जातात असे शिवतारे म्हणाले. शिवतारे यांनी बारामतीतील पश्चिम भागाचा दोन वेळा दौरा करुन घोंगडी बैठका घेतल्या आहेत. पवारांचे विरोधक प्रामुख्यानं बारामतीतील जिरायती भागाचा दौरा करत आहेत. या भागतील मूळ प्रश्न हा पाण्याचा आहे. दरम्यान, आता सरकार देखील शिवसेना आणि भाजपचे आहे. त्यामुळं आता शिवतारे यांनी केलेली ही मागणी पूर्ण कधी होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: