Pune Bandh : वादग्रस्त वक्तव्यांविरोधात आज पुणे बंदची हाक; विविध संघटनांचा सहभाग, काय सुरु, काय बंद?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी (Bhagat Singh Koshyari ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत (Chatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आज पुणे बंदची हाक दिली आहे.
Pune Bandh news : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh koshyari), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), प्रसाद लाड (Prasad Lad) आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात निषेध म्हणून सामाजिक संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी पुकारलेल्या पुणे बंदचा परिणाम आज दिसून येणार आहे. व्यापारी संघटना, आडत व्यापारी वगैरेंनी या बंदला पाठिंबा दिला आहे. या बंदसाठी उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती, सुषमा अंधारे, सुप्रिया सुळे आणि इतरही अनेक नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा आणि ठाकरे गट देखील या बंदमध्ये सहभागी होणार आहे. त्या सोबतच पुण्यातील व्यापारी संघटना आणि गणेशोत्सव मंडळांनीदेखील पाठिंबा दिला आहे. आज सकाळी 9-30 वाजता डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मूक मोर्चास प्रारंभ होणार आहे. डेक्कन जिमखाना, अलका चित्रपटगृह चौक, मार्गे लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकातून लालमहाल येथे मुकमोर्चाची सांगता जाहीर सभेने होणार आहे.
नेत्यांची उपस्थिती
या मोर्चात छत्रपती उदयनराजे महाराज, छत्रपती संभाजी राजे, विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आदी नेते सहभागी होणार आहेत तसेच ते जाहीर सभेतही भाषण देखील करणार आहेत.
3 वाजेपर्यंत दुकानं बंद
राज्यपालांसह वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात सगळ्या संघटना एकवटल्या आहेत. व्यापारी संघाने देखील पाठिंबा दिला आहे. लक्ष्मी रोड परिसरातील सगळी दुकानं तीन वाजेपर्यंत बंद असणार आहेत. राज्यपालांच्या वक्तव्यावरुन व्यापारी देखील आक्रमक झाल्याचं दिसत आहे. त्यांनी देखील राज्यपालांचा निषेध व्यक्त केला आहे.
मार्केट यार्ड बंद
राज्यपालांविरोधात बंदची हाक दिल्यावर मार्केट यार्डमधील संघटनांनीदेखील पाठिंबा दिला आहे. त्यांनीदेखील काही वेळ मार्केट यार्डमधील भाजी मार्केट आणि फुल मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शाळा बंद ठेवण्याचं आवाहन
पुणे शहरात बंदची हाक दिली आहे. त्यामुळे आज काही प्रमाणात पुणे बंद राहणार आहे. आयोजकांनी शाळांनादेखील बंद ठेवण्याचं आवाहन केलं आहे. मात्र शाळा बंदच ठेवा अशी सक्ती करण्यात आली नाही आहे. त्यामुळे पुण्यातील काही शाळा बंद तर काही सुरु राहण्याची शक्यता आहे. मात्र जास्तीत जास्त शाळा बंद ठेवून पुणे बंदला पाठिंबा द्यावा, असं आवाहन आयोजक सचिन आडेकर यांनी केलं आहे.
राज्यपालांना हटवण्याची मागणी
छत्रपती शिवाजी महारांबाबत भगतसिंह कोश्यारींनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राज्यभरात वातावरण पेटलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. राज्यपालांना हटवा, अशी मागणी करण्यात आली मात्र अजूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आहे. त्यामुळे भाजपविरोधात देखील सगळे पक्ष आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा, ठाकरे गट, सर्व शिवप्रेमी आणि सामाजिक संघटना एकत्र आल्या आहेत. त्यांनी आज बंद पुकारला आहे.
काय सुरु काय बंद?
पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत येत असल्याने पुणे जिल्ह्यातील इंधन पंप उद्याही सुरू राहणार आहेत. पेट्रोल पंप मालकांनी पोलिसांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी केली आहे. किराणा, बेकरी आणि दुधाचे दुकानं दुकाने यांसारख्या अत्यावश्यक सेवा सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू राहतील. त्यानंतर तीन वाजेपर्यंत बंद राहतील. बंद दरम्यान वैद्यकीय दुकाने सुरू राहणार आहेत.