Pooja Khedkar: पूजा खेडकर प्रकरणी पुण्यातील YCM रुग्णालयासह डीनही अडचणीत! होणार स्वतंत्र चौकशी; दिव्यांग आयुक्तालयाने चौकशी अहवाल फेटाळला
Pooja Khedkar: वायसीएमने पूजा खेडकरला डाव्या गुडघ्यात सात टक्के कायमस्वरूपी आधु असल्याचं अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले होते. मात्र या प्रमाणपत्राबाबत शंका उपस्थित करत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
पुणे: बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रकरणात वायसीएम रुग्णालय आणि अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळेंच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कारण डॉक्टर वाबळेंचा चौकशी अहवाल राज्य दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने फेटाळला आहे. सोबतच पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयासह डॉक्टर वाबळेंची स्वतंत्र चौकशी करावी, असं थेट वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिवांसह राज्य सरकारच्या संबंधित विभागांना कळवलं आहे. राज्याचे दिव्यांग आयुक्त प्रवीण पुरी यांनी याबाबतची माहिती 'एबीपी माझा'ला दिलेली आहे.
वायसीएमने पूजा खेडकरला (Pooja Khedkar) डाव्या गुडघ्यात सात टक्के कायमस्वरूपी आधु असल्याचं अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले होते. मात्र या प्रमाणपत्राबाबत शंका उपस्थित करत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने एबीपी माझाने देखील अनेक महत्वाची कागदपत्रे समोर आणत, पूजाला (Pooja Khedkar) दिलेल्या अपंगत्व प्रमाणपत्रासह चौकशी अहवालाबाबत ही अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यालाच अनुसरून दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने डॉक्टर राजेंद्र वाबळेंचा चौकशी अहवाल फेटाळला आहे.
ज्यांच्या सहीने पूजाला (Pooja Khedkar) अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आलं, त्या वाबळेंनी ही चौकशी कशी काय केली? हे योग्य आहे का? शिवाय अपंगत्व ठरविण्यासाठी तपासण्यात आलेल्या एमआरआय रिपोर्टवर ही दिव्यांग आयुक्तालयाने शंका उपस्थित करत, डॉक्टर वाबळेंचा चौकशी अहवाल फेटाळला आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने थेट राज्य सरकारच्या संबंधित विभागाला 27 ऑगस्टला पत्र लिहिलं असून त्यात वायसीएम रुग्णालयासह अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळेंची स्वतंत्र चौकशी करावी, असं त्यात नमूद केलं आहे. त्यामुळं वायसीएम रुग्णालय आणि अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळेंची कधी ही चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.
पूजा खेडकरला अटकेतून दिलासा, अटकपूर्व जामिनाला 5 सप्टेंबरपर्यंत दिली मुदतवाढ
बडतर्फ माजी प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकरला (Pooja Khedkar) दिल्ली उच्च न्यायालयाकडून पुन्हा दिलासा मिळाला आहे. विहित मर्यादेपेक्षा जास्त बनावट ओळखीच्या आधारे यूपीएससी परीक्षेला बसल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने पूजा खेडकरला अटकेपासून अंतरिम संरक्षणाची मुदत 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. बनावट ओळखीच्या आधारे नागरी सेवा परीक्षेत बसल्याबद्दल UPSC ने गेल्या महिन्यात पूजा खेडकरवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासह कडक कारवाई केली होती. दिल्ली पोलिसांनी भारतीय दंड संहिता, आयटी कायदा आणि अपंग व्यक्तींचे हक्क कायद्याच्या तरतुदींनुसार एफआयआर नोंदवला आहे. 31 जुलै रोजी यूपीएससीने पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली होती आणि तिला भविष्यातील परीक्षांना बसण्यास मनाई केली होती.
बुधवारी पूजा खेडकरने (Pooja Khedkar) दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, तिची निवड आणि नियुक्ती झाल्यानंतर, UPSC कडे तिला अपात्र ठरवण्याचा अधिकार नाही आणि तिच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केवळ केंद्राच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडूनच (DoPT) केली जाऊ शकते. पूजा खेडकरने UPSC द्वारे तिच्यावर लावलेल्या बनावट कागदपत्रे आणि फसवणुकीच्या आरोपांचे खंडन करत चार पानी उत्तर दाखल केले. तिच्या उत्तरात पूजाने दावा केला आहे की, तिने 2012 ते 2022 पर्यंत तिचे नाव किंवा आडनाव बदलले नाही किंवा तिने तिच्या नावात फेरफार केली नाही किंवा आयोगाला चुकीची माहिती दिली नाही.