(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar : अजित पवारांचा नाशिक दौरा रद्द, हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे घेतला निर्णय
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. पुण्याहून नाशिकला जात असताना हा तांत्रिक बिघाड झाला आहे.
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा रद्द करण्यात आला आहे. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे दौरा रद्द करण्यात आला आहे. हेलिकॉप्टर मुंबईहून अजित पवार यांना पुण्यातून घेऊन नाशिकमध्ये जाणार होते. मात्र हेलिकॉप्टर वेळेत न आल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे. नाशिकनंतर अजित पवार यांचा अहमदनगर दौरा होता. नाशिकला नियोजित कार्यक्रमासाठी निघाले असताना हा प्रकार घडला आहे.
अजित पवार पुण्याहून नाशिकला निघत होते. त्यावेळी हेलिकॉप्टर वेळेत आलं नाही. त्यानंतर त्यांचं कार्यालय पर्यायी व्यवस्था शोधत होते. मात्र नाशिकला जाईपर्यंत उशीर झाला असता आणि कार्यक्रमाची वेळ निघून गेली असती. त्यामुळे अजित पवारांनी तातडीने हा दौरा रद्द केला आहे. नाशिकमध्ये पोलीस परेड ग्राऊंडला त्यांचा एक कार्यक्रम नियोजित होता. त्यानंतर महाबोधी बौद्ध महोत्सवात ते हजेरी लावणार होते. मात्र हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
पुण्यात विविध कार्यक्रमात हजेरी
अजित पवार सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यात अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहे. मागील दोन दिवस त्यांनी पुण्यात वेगवेगळ्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. पुण्याचं पालकमंत्रीपद स्विकारल्यानंतर त्यांनी पुण्यात बैठका घेत अधिकाऱ्यांना नीट काम करण्यासाठी दम दिला आणि विकास कामांची पाहणीदेखील केली होती. त्यानंतर त्यांनी विविध विकास कामांसाठी रखडलेला निधी मंजूर केला आणि विकास कामांना गती देण्याचे आदेश दिले.
कार्यक्रम संपताच अजित पवार निघून गेले...
त्यानंतर काल (24 ऑक्टोबर) ला अजित पवारांनी बारामतीत हजेरी लावली होती. विद्या प्रतिष्ठानच्या शाळेच्या नुतन इमारतीच्या उद्घाटनासाठी अजित पवार बारामतीत गेले होते. या कार्यक्रमात संपूर्ण पवार कुटुंबिय एकत्र दिसले होते. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबतच पवार कुटुंबातील बाकी सदस्यदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमात पवारांची कौटुंबिक एकी दिसून आली. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी फोटोसेशनदेखील केलं होतं. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंनी भाषणंदेखील झाली. मात्र या भाषणात पवार कुटुंबियांनी एकमेकांवर टीका करताना दिसले नाहीत. याच कार्यक्रमात मात्र अजित पवार कार्यक्रम संपल्यावरच तडकाफडकी निघून गेल्याचं पाहायला मिळालं होतं. शरद पवार भाषण करताना अजित पवारांनी बॅच काढून ठेवला होता. त्यानंतर त्यांनी काही वेळ मोबाईल चाळला आणि शरद पवारांचं भाषण संपताच अजित पवार निघून गेले होते.