पुरेसं ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू, तेराव्याला कुटुंबियांकडून रोपांचे वाटप
भविष्यात आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासू नये, त्या अभावी शिंगोटे प्रमाणे एकही रुग्ण दगावू नये, हाच यामागचा त्यांचा हेतू आहे. शिंगोटे कुटुंबियांनी याचं रोपटं लावलंय, त्याचं वटवृक्ष करण्याची जबाबदारी आता प्रत्येकाने घ्यायला हवी.
पिंपरी-चिंचवड : पुण्याच्या जुन्नरमध्ये कोरोनामुळे मृत पावलेल्या संतोष शिंगोटे यांचा तेरावा पार पडला. यावेळी कोरोना नियमांचे पालन करून, उपस्थितांना आंब्याच्या रोपांचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशातच पुरेसं ऑक्सिजन न मिळाल्याने संतोष शिंगोटे यांचाही मृत्यू झाला. हीच बाब लक्षात घेत शिंगोटे कुटुंबियांनी या कौतुकास्पद उपक्रमाचा श्रीगणेशा केला.
38 वर्षीय संतोष शिंगोटे यांना एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला अधिकचा काही त्रास जाणवत नव्हता म्हणून, त्यांच्या खामुंडी गावातीलच एका डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण काही दिवसांनी तब्येत खालावत असल्याचे त्यांच्या लक्षात आलं. श्वास घ्यायला त्रासही जाणवू लागला होता. म्हणून त्यांना ऑक्सिजन उपलब्ध असणाऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी तातडीनं उपचाराची सूत्र हलवली, नंतर तब्येतीत चढ-उतार सुरूच होता. अशातच राज्यात कोरोनाचा तुटवडा जाणवू लागला. तरी त्यांच्यावर उपचार सुरू असणाऱ्या रुग्णालयात काही प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा शिल्लक होता. पण तो संतोष यांना पुरेसा नव्हता, अशी माहिती मिळत होती. डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरूच होते. अशातच संतोष यांची मृत्यूशी झुंज संपली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. अवघ्या 38 वर्षात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
सिमेंटची जंगलं वाढवण्याच्या नादात वृक्षांची सर्रास कत्तल होते. परिणामी निसर्गातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागली आहे. याची जाणीव कोरोनाने अख्ख्या देशाला करून दिली. म्हणूनच संतोष यांच्या कुटुंबीयांनी सामाजिक संदेश देण्याचं ठरवलं. यातूनच तेराव्याला उपस्थित राहणाऱ्यांना आंब्याची रोपांचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत, हा तेरावा पार पडला. यावेळी उपस्थित नातेवाईकांनी या उपक्रमाला साथ देत, तातडीनं या रोपांची लागवड ही केली.
भविष्यात आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासू नये, त्या अभावी संतोष प्रमाणे एक ही रुग्ण दगावू नये, हाच यामागचा हेतू आहे. शिंगोटे कुटुंबियांनी याचं रोपटं लावलंय, त्याचं वटवृक्ष करण्याची जबाबदारी आता प्रत्येकाने घ्यायला हवी.
इतर महत्त्वाच्या बातम्या