Marathwada Heavy Rain Drought: मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा; सर्वपक्षीय आमदारांची अजित पवारांकडे मागणी, कॅबिनेट बैठकीत निर्णयाची शक्यता
Marathwada Rain: मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून धो-धो पाऊस पडत आहे. पावसाचा मोठा फटका शेतीला बसला आहे. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Marathwada Heavy Rain Drought: गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी (Heavy Rain) झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील आमदारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे, मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली. यासंदर्भात मंगळवारी भाजप आमदार रत्नाकर गुट्टे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे, राजेश विटेकर आणि ठाकरे गटाचे राहुल पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतली. परभणी आणि हिंगोली (Hingoli news) जिल्ह्यात पावसाचा मोठा फटका शेतीला बसला आहे. त्यामुळे मराठवाड्यात ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी या आमदारांनी केली.
शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. केळी, ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले असून जीवितहानीदेखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. अजितदादांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम व्हावे, अशी मागणी आहे, असे आमदार राजू नवघरे यांनी सांगितले. तर आमदार रत्नाकर गुट्टे यांनी म्हटले की, आम्ही अजितदादांना भेटून निवेदन दिले. गेल्या 50 वर्षांमध्ये इतका पाऊस कधीच झाला नाही. त्यामुळे धान्य वाहून गेले. त्यामुळे आम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. माझ्या मतदारसंघात मोठे नुकसान झाले आहे. आयुष्यात मी इतकं नुकसान पाहिलं नव्हतं. आज कॅबिनेट बैठक आहे, तेव्हा आम्ही विचार करु असे अजितदादा म्हणाले, असे रत्नाकर गुट्टे यांनी सांगितले.
मराठवाड्यात गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस कोसळतोय. आम्ही मदत मागण्यासाठी अजित पवार यांच्याकडे आलो होतो. सोयाबीनची लागवड झालेली आहे, पिकांचे नुकसान झाले आहे. अशात, शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी केली आहे. ओला दुष्काळ सततचा पाऊस, 62 मिमीहून अधिकचा पाऊस असेल यासंदर्भात मदत द्यावी अशी मागणी आहे. महायुतीने वचननाम्यानुसार वचनं पाळली पाहिजे, असे ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांनी म्हटले.
Marathawada Rain: मराठवाड्यात धो-धो पाऊस, शेतकरी हवालदिल
मराठवाड्यात गेल्या 24 तासांत 32 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बीड, लातूर, धाराशिव,,हिंगोली या जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद. गेल्या 24 तासात सर्वाधिक बीड जिल्ह्यातील 15 मंडळात अतिवृष्टीची झाल्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील 15 , लातूर 4, धाराशिव 7, परभणी 4 आणि हिंगोली जिल्ह्यातील 2 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा दोन्ही धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. सेलूती लोअर दुधना प्रकल्पाचे 20 पैकी 14 दरवाजे उघडून 14 हजार 228 क्यूसेक्स पाणी पूर्णा नदी पात्रात सोडण्यात आले आहेत. तर दुसरीकडे जिंतूरच्या येलदरी प्रकल्पाचेही १० पैकी ६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. ज्यातून 15000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग हा पूर्णा नदीत केला जातोय. त्यामुळे गोदावरी पाठोपाठ पूर्णा आणि दुधना या दोन्ही नद्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे सध्या जिल्ह्यातील तीनही प्रमुख नद्या तुडुंब भरून वाहत आहेत.
हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे. त्या पावसामुळे शेतातील सोयाबीन, कापूस, हळद, ऊस या पिकांचे अतोनात नुकसान झालेल आहे. सोयाबीनचे पीक तर अक्षरशः वाहून गेले आहे. शेतातील सुपीक जमीन सुद्धा वाहून गेली आहे. त्यामुळे शेतीचं अतोनात नुकसान झाले आहे शेतकरी हैराण झालेले आहेत. कर्ज घेऊन जोपासलेली पिकं अशा पद्धतीने पावसाने वाहून गेल्याने पुढील वर्षभरास नियोजन कसं करायचं, असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा आहे. त्यामुळे सरकारने आणि या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आणखी वाचा
चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली, वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली, PHOTO
























