Siddharth Shinde Passes Away: माजी कृषीमंत्र्यांचा नातू, कायदा सोप्या भाषेत समजावून सांगणारा विधिज्ञ, कोण होते सिद्धार्थ शिंदे?
Siddharth Shinde Passes Away: सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कायदेशीर लढाईमुळे सिद्धार्थ शिंदे यांचा चेहरा अनेकांना परिचित होता. सोप्या भाषेत कायद्याचे विवेचन.

Supreme court Lawyer Siddharth Shinde Passes Away: एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड करुन शिवसेना फोडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दीर्घकाळ सुरु असलेल्या कायदेशीर लढाईचे आणि निर्णयांचे सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत तपशीलवार विवेचन करणारे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे (Lawyer Siddharth Shinde) यांचे अकाली निधन झाले आहे. ते अवघ्या 48 वर्षांचे होते. सिद्धार्थ शिंदे हे सोमवारी नेहमीप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) कामकाजासाठी गेले असताना त्यांना चक्कर आली. यानंतर त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात (AIIMs hospital) हलवण्यात आले. मात्र, काल रात्री हृदयक्रिया बंद पडल्याने सिद्धार्थ शिंदे यांची प्राणज्योत मालवली. सर्वोच्च न्यायालयातील महत्त्वाच्या खटल्यांच्या निर्णयांचे कायदेशीर पैलू सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी ते चिरपरिचित होते. त्यांच्या अकाली निधनाने अनेकांना धक्का बसला आहे.
अहिल्यानगरमधील श्रीरामपूर हे सिद्धार्थ शिंदे यांचे मूळगाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धार्थ शिंदे यांचे कुटुंब पुण्यात वास्तव्याला आहे. त्यामुळे त्यांचे पार्थिव आज पुण्यातील घरी आणले जाईल. यानंतर दुपारी 1 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात रंजक घडामोडी घडल्या होत्या. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष कोणाचे, यावरुन सर्वोच्च न्यायालयात दीर्घकाळ कायदेशीर लढाई सुरु होती. या काळात सिद्धार्थ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांबाबत दिलेल्या निर्णयांचे आणि निर्देशांचे कायदेशीर आणि दूरगामी परिणाम करणारे पैलू सर्वसामान्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयातील महत्त्वाचे खटले, निर्णय आणि कायदेशीर गोष्टींचे सोप्या भाषेत विश्लेषण करण्यात सिद्धार्थ शिंदे यांचा हातखंडा होता. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीची आणि संविधानाचे सखोल ज्ञान असणारा तज्ज्ञ म्हणून सिद्धार्थ शिंदे यांची ओळख होती.
सिद्धार्थ शिंदे हे राज्याचे माजी कृषीमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून काम करत होते. सिद्धार्थ शिंदे यांना महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींची बारकाईने जाण आणि संविधानाविषयी सखोल ज्ञान होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सिद्धार्थ शिंदे यांच्या अकाली निधनाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आणखी वाचा
सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन; दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने मालवली प्राणज्योत























