Pahalgam Terror Attack: 'त्या' काश्मिरी देवमाणसाला आयुष्यभर विसरणार नाही, वडिलांना अग्नी दिल्यानंतर आसावरी जगदाळेने थरार सांगितला!
Pahalgam Terror Attack: माझ्या वडिलांना 3 गोळ्या लागल्या. माझे वडील जागेवर पडले होते. काकांना देखील दोन गोळ्या लागल्या. एका तिथल्या स्थानिकाने आम्हाला मदत केली. सगळ्या स्थानिकांनी भरपूर मदत केली, असंही तिने सांगितलं.

पुणे: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील जिवलग मित्र संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. फिरायला गेलेल्या कुटुंबाचा आनंद क्षणात हिरावला गेला. दोन्ही कुटुंबे अजूनही मोठ्या धक्क्यात आहेत. पहलगाममध्ये मंगळवारी (दि.23) झालेल्या हल्ल्यात संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. दरम्यान आज दोन्ही मित्रांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. हल्ल्या झाला त्यावेळी अंगावर जे कपडे होते, त्यावरती रक्ताचे शिंतोडे पडले होते, त्याच कपड्यांनी आसावरीकडून वडिलांना अग्नी दिला आहे. आज सकाळी संतोष जगदाळेंवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दरम्यान त्या थरारक घटनेबाबत आसावरी जगदाळेने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.
आसावरी जगदाळे म्हणाली, 30 मिनिटे आम्ही चढून तिथं गेलो. जागा खूप सुंदर आहे. फोटो काढत असताना अचानक फायरिंग सुरू झाली. लोक पळायला लागली. आम्ही टेंटमध्ये लपलो होतो. गणबोटे काका खाली झोपले होते, अनेक लोक तिथे टेंटमध्ये लपली होती. अनेक लोकांवर फायरिंग झाली. एकजण आमच्याकडे आला त्याला पकडून गोळ्या मारल्या. माझ्या वडिलांना 3 गोळ्या लागल्या. माझे वडील जागेवर पडले होते. काकांना देखील दोन गोळ्या लागल्या. त्यांनी फक्त पुरुषानं मारलं. आम्ही तिथून पळून आलो. एका तिथल्या स्थानिकाने आम्हाला मदत केली. सगळ्या स्थानिकांनी भरपूर मदत केली, असंही तिने सांगितलं.
मला तिथं चक्कर आली होती. मिलिटरी तिथे पोहचली होती. सगळ्या जखमी लोकांना श्रीनगरमध्ये शिफ्ट केलं गेलं होतं. रात्री 12 वाजता कळलं की, काही जणांचा मृत्यू झाला आहे. आम्हाला ओळख पटवण्यासाठी नेण्यात आलं. मला तेव्हा कळलं की बाबांचा आणि काकांचा मृत्यू झाला आहे. तिथला देवासारखा एक माणूस आमच्यासोबत उभा होता. आम्ही त्यांचे आयुष्यभर उपकार विसरणार नाही. आर्मीने आम्हाला खूप मदत केली. माझे वडील माझ्या कुटुंबाचे एकमेव आधार होते. घरात तेच कमवते होते. आज मी माझ्या वडिलांचा अंत्यसंस्कार करून आले. मला ते सगळं विसरणं खूप अवघड आहे, असंही ती पुढे म्हणाली.
माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडीलांना गोळ्या मारल्या आहेत. हे माणसं नाहीत राक्षस आहेत. ते पहाडी मधून आले जंगलातून अचानक आले. चारही बाजूला मृतदेह दिसत होते. ते अतिरेकी कुठून आले सांगू शकणार नाही. कारवाई झाली पाहिजे कुणालाही सोडू नका. फायरींग करणारे चार ते पाच लोक होते. 15 ते 20 मिनिटे सगळं सुरू होतं. कलमा वाचून दाखवा असं ते म्हणत होते. त्याचा होता का? कुठल्या हेतूने त्यांनी मारलं हे माहिती नाही. माझे वडील म्हणत होते, तुम्हाला जे हवंय ते करतो, पण तरीही मारलं.
अनेकांच्या डोक्यात गोळ्या मारल्या होत्या. ते म्हणत होते की, आम्ही लहान मुलांना आणि स्त्रियांना मारणार नाही, असंही यावेळी आसावरी जगदाळेनी सांगितलं.





















