इंग्लंडहून पुण्यात आलेले 109 पैकी 5० प्रवासी सापडले, इतर ... प्रवाशांचा शोध बाकी
इंग्लंडहून 1 डिसेंबरपासून पुण्यात आलेल्या 109 प्रवाशांचा थांगपत्ता लागत नसल्याने पुणे महापालिकेने शहर पोलिसांकडे धाव घेतली होती. त्यातील आता 50 प्रवाशांचा शोध लागला आहे. इंग्लंडहून 1 डिसेंबरपासून पुण्यात आलेल्या प्रवाशांचा थांगपत्ता लागत नसल्याने पुणे महापालिकेने शहर पोलिसांकडे धाव घेतली होती.
पुणे : 1 डिसेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत इंग्लडहून येणाऱ्या प्रवाशांच्या ना कोरोना चाचण्या करण्यात आल्या ना त्यांना इन्स्टिट्यूशनल कॉरन्टीन करण्यात आलं. इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नवीन विषाणूचा प्रकोप वाढल्यावर या प्रवाशांची शोधाशोध सुरु झाली . त्यापैकी 109 प्रवाशांचा तर थांगपत्ताच लागत नव्हता. त्यातील पुण्यात राहणाऱ्या 35 जणांचे पत्ते आता कुठे सापडलेत . आता त्यांच्या घरी जाऊन तपासणी करायचं महापालिकेने ठरवलं. महिनाभरानंतर करण्यात येणाऱ्या या तपासणीला वरातीमागून घोडं असंच म्हणायची वेळ आली आहे.
जे प्रवासी इंग्लडहून भारतात परतून कित्येक दिवस लोटलेत त्यांचा शोध अजूनही सुरूच आहे . त्यामुळं या प्रवाशांसह कोरोनाचा नवीन विषाणू भारतात आणि महाराष्ट्रात देखील वेगाने पसरण्याचा धोका वाढलाय. 1 ते 22 डिसेंबर या कालावधीत इंग्लडहून पुण्याला येणाऱ्या 542 प्रवाशांपैकी 109 प्रवाशांचा अपुरे पत्ते आणि चुकीच्या मोबाईल नंबर अभावी थांगपत्ताच लागत नव्हता . त्यामुळं त्यांचा शोध घेण्याची जबाबदारी पोलिसांकडे सोपवण्यात आली. पोलिसांनी त्यापैकी 50 जणांचे पत्ते शोधून काढण्यात यश मिळवलं आणि ते पत्ते महापालिकेकडे सोपवले. त्या पन्नास पैकी 35 प्रवासी हे पुण्यातील आहेत. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून त्या पत्त्यांवर जाऊन या प्रवाशांची तपासणी करण्याची जबाबदारी त्या त्या भागातील क्षेत्रीय कार्यलयांवर सोपवण्यात आली आहे . आजपासून या 35 प्रवाशांच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे.
इंग्लडमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या धोका लक्षात आल्यावर बावीस डिसेंबर नंतर येणाऱ्या प्रवाशांना कंपलसरी कॉरंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. कारण त्या आधी आलेले प्रवासी देशभरातील त्यांच्या गावी पोहचले होते. या प्रवाशांना शोधण्यासाठी एअरपोर्ट अथॉरिटीकडून जी'यादी देण्यात आली ती देखील अपुरी होती . त्यातील कित्येक नावांपुढे पत्ताच नव्हता तर काही नावांपुढे त्यांचा इंग्लंडमधील मोबाईल नंबर नोंद होता . त्यामुळं ज्या 109 प्रवाशांचा थांगपत्ता लागत नव्हता त्यापैकी पन्नास जणांचे पत्ते पोलिसांनी शोधून दिल्यावर त्यापैकी 35 प्रवासी पुण्यातील 15 प्रवासी इतर जिल्ह्यांमधील तर काही इतर राज्यांमधील असल्याचं आढळलं. आता पुणे महापालिकेकडून तिथल्या स्थानिक प्रशासनाला पत्र पाठवून त्यांची माहिती दिली जाणार आहे.
कोरोनाच्या मागील आठ - नऊ महिन्यांच्या अनुभवातून आपल्या यंत्रणा काहीच शिकलेल्या नाहीत. खरंतर इंग्लडहून येणाऱ्या प्रवाशांना इमिग्रेशनच्याच टप्प्यावर थांबवून तिथं त्यांची कोरोना चाचणी करण्याची आणि आवश्यक असल्यास इन्स्टिट्यूशनल कॉरंन्टीन करण्याची गरज होती . परंतु त्या प्रवाशांना जाऊ देण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना शोधण्याची जबाबदारी स्थानिक पोलीस आणि प्रशासनावर सोपवण्यात आली. याला वरातीमागून घोडं असंच म्हणावं लागेल.
इंग्लंडमध्ये एकीकडे कोरोनाच लसीकरण सुरु झालेलं असताना दुसरीकडे कोरोनाच्या नव्या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं पुन्हा कडक लोकडाऊन करण्याची वेळ आलीय. इंग्लडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना त्यांचा 26 जानेवारीच्या निमित्ताने आयोजित भारत दौराही रद्द करावा लागलाय. मात्र कोरोनाला रोखण्याची जबाबदारी जेवढी यंत्रणांची आहे तेवढीच परदेशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची देखील आहे. मात्र दोन्हींकडून त्याबाबत हलगर्जीपणा दिसून येतोय जो महागात पडू शकतो.
संबंधित बातम्या :