(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विद्यापीठांमधले शिक्षकेतर कर्मचारी संपावर, अंतिमवर्ष परीक्षेचं नियोजन कोलमडलं
अंतिम वर्षीच्या विद्यार्थ्यांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. अजून परीक्षेचा टाईमटेबल नाही, सराव परिक्षा नाही, अशा परिस्थितीमध्ये अभ्यास करायचा कसा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
पुणे : राज्यातील अकृषी विद्यापीठांमधले शिक्षकेतर कर्मचारी सध्या संपावर आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारीही संपावर आहेत. पण यामुळे अंतिम वर्षांच्या परिक्षांचं नियोजन मात्र पुर्णपणे कोलमडलं आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑक्टोबर महिन्यापासून अंतिम वर्षाच्या बॅकलॉग आणि नियमित विद्यार्थ्यांच्या परिक्षांना सुरुवात होणार होती. अंतिम वर्षाच्या परिक्षा ऐन तोंडावर आल्या असताना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्या पुर्ण करुन घेण्यासाठी संपाचं हत्यार उपसलं आहे. 24 सप्टेंबरपासून राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी संपावर गेले आहेत. विद्यापीठाच्या शिक्षकेतर सेवक कृती समितीच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत- सुधारित आश्वासित प्रगती योजना पुनर्जिवीत करण्यात यावी, सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा आणि इतर प्रलंबित मागण्या.. या मागण्यांच्या पुर्ततेचं जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय या कृती समिती घेतला आहे. 1 ऑक्टोबरपासून विद्यापीठ बंद आंदोलनाचा इशाराही देण्यात आहे.
“सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी आम्ही 2016 पासून करतोय. तेव्हापण 2 महिन्यांत सातवा वेतन आयोग लागू करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. पण ती मागणी पुर्ण झाली नाही. आता आम्हाला लेखी आश्वासन मिळाल्याशिव आम्ही संप मागे घेणार नाही” सुनिल धिवार उपाध्यक्ष पुणे विद्यापीठ शिक्षकतेर सेवक कृती समिती यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
पण या संपामुळे मात्र अंतिम वर्षांच्या परिक्षांचं विद्यापीठाचं नियोजन पुर्णपणे कोलमडलं आहे. या परिक्षांच्या फक्त प्रश्नपत्रिका तयार झाल्या आहेत. पण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याशिवाय पुढे काहीच करु शकत नाही अशी प्रतिक्रिया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ नितीन करमळकर यांनी व्यक्त केली. शासनाने लवकर लवकर हे आंदोलन सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
“शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम अंतिम वर्ष परिक्षेच्या नियोजनावर निश्चितपणे झाला आहे. आमचे 100 शिक्षकेतर सहकारी संपावर आहेत. ज्या सगळ्या गोष्टी सहकार्यातून होत असतात त्यावर परिणाम झाला आहे. शिक्षक घेऊन आम्ही फक्त पेपर काढण्याइतपतच आपली आत्ता तयारी आहे. आमची अपेक्षा आहे की यावर येत्या 1-2 दिवसांमध्ये तोडगा निघेल. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. हे आंदोलन सुटण्यासाठी शासनाने योग्य मार्ग काढला तर बरं होईल. टाईम टेबल देऊ आपण पण फक्त टाईम टेबल देऊन काय होणार? या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही.” कुलगुरुंनी डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितलं.
तर या घडामोडींमुळे अंतिम वर्षीच्या विद्यार्थ्यांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. अजून परीक्षेचा टाईमटेबल नाही, सराव परिक्षा नाही, अशा परिस्थितीमध्ये अभ्यास करायचा कसा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
आधी अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबतची अनिश्चितता, मग परिक्षेचा नवीन फाॅर्म्याट, परीक्षेच्या तयारीसाठी मिळालेला कमी वेळ, पुस्तकांची कमतरता या परिस्थितीमधून जाऊन परिक्षा देण्यासाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थी सज्ज झाले असतानाच आता हा संप सुरु झाला आहे. त्यामुळे परीक्षा देऊन सुटकेचा निःश्वास टाकण्यासाठी अधीर झालेले विद्यार्थ्यांना परत मनस्ताप सहन करावा लागतोय.