(Source: ECI | ABP NEWS)
निलेश घायवळला ओळखतो, पण तो मित्र नाही; धंगेकरांच्या आरोपानतंर समीर पाटील माध्यमांपुढे आले
पुण्यातील कोथरुड येथील व्यावसायिक समीर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निलेश घायवळ प्रकरणावर आपले मौन सोडले, तसेच, रविंद्र धंगेकर यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले.

पुणे : शहरातील कोथरुडचा (Pune) गुंड निलेश घायवळ (Nilesh ghaywal) प्रकरणावरुन राजकारण चांगलंच तापलं असून शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी थेट भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनाच लक्ष्य केलं आहे. गुंड निलेश घायवळ हा विदेशात पसार झाला असून त्याच्या पासपोर्टबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यातच, रविंद्र धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांच्यावर आरोप करत समीर पाटील हे कोथरुड मधील गुन्हेगारी चालवत असल्याचा आरोप केला. तसेच, समीर पाटील यांचा गुंड निलेश घायवळसोबतचा फोटो पुढे करत गंभीर आरोपही केले आहेत. त्यावर आता समीर पाटील यांनी पत्रकार परिषद घेत रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपाल उत्तर दिले. तसेच, निलेश घायवळ याच्यासमवेत माझी ओळख आहे, पण तो माझा मित्र नाही, असेही समीर पाटील यांनी म्हटलं आहे.
पुण्यातील कोथरुड येथील व्यावसायिक समीर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निलेश घायवळ प्रकरणावर आपले मौन सोडले, तसेच, रविंद्र धंगेकर यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले. यावेळी समीर पाटील म्हणाले की, निलेश घायवळसोबत माझा कोणता फोटो धंगेकरांनी आणला आहे, हे मला माहित नाही, याचं स्पष्टीकरण त्यांनीच द्यावं. तसेच मी कधीही अस म्हटलं नाही की निलेश घायवळला मी भेटलो नाही, त्याला ओळखत नाही. मी कोथरूडकर असून मी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने गेलो असेल, तेव्हा घायवळसोबत भेट झाली असेल. मी त्यांना ओळखतो पण ते माझे मित्र आहेत असं मी म्हटलेलं नाही. धंगेकर यांनी माझ्यावर जे दोन आरोप केले होते, त्यात पहिलं त्यांनी म्हटलं होतं की मी दादाच्या ऑफिसमध्ये कामाला आहे आणि दुसरा म्हणजे मी मकोकाचा आरोपी आहे. पण, मी 2000 सालापासून पुण्यात असून निवडणुकीत चंद्रकात पाटील यांचं मी काम केलं आहे. कोथरुडमध्ये आज मला सगळी मंडळीओळखत असून रवींद्र धंगेकर यांनी जे आरोप माझ्यावर केले आहेत, त्याचे पुरावे त्यांनी द्यावे असे आव्हान पाटील यांनी धंगेकरांना दिले आहे.
रविंद्र धंगेकरांचे आरोप काय?
दरम्यान, चंद्रकात पाटील हे आता आत्मचिंतन करत असतील, तर आत्मचिंतन केल्यानंतर ते बोलतील असे म्हणत समीर पाटील याचा गृहमंत्र्यांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी रविंद्र धंगेकर यांनी केली होती. तसेच, समीर पाटील हा मोक्यातील गुन्ह्याचा आरोपी आहे, असे म्हणत समीर पाटील यांचा निलेश घायवळसोबतचा फोटोही धंगेकरानी दाखवला होता. तर, निलेश घायवळ संदर्भात पोलीस महासंचालकांना पत्र लिहिल्याची माहिती त्यांनी दिली. समीर पाटील हा पोलिसांवर दादागिरी करत आहे, असे पोलीसच सांगतात. त्यामुळे, चंद्रकात पाटलांना त्यांच्या ताटाखाली काय चाललं आहे हे का कळत नाही? समीर पाटीलचा बंदोबस्त केला पाहिजे, असेही धंगेकरांनी म्हटले होते.
हेही वाचा
मुंबईत उंच इमारतीवरुन वीट कोसळली; नोकरीसाठी निघालेल्या 22 वर्षीय संस्कृतीचा मृत्यू, वडिलांचा टाहो

























