(Source: ECI/ABP News/ABP Majha)
व्हॉल्व असलेला एन-95 मास्क वापरणे सुरक्षित नाही?
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यापासून एन-94 मास्कचा वापर हा व्हायरसपासून स्वत:चा बचाव होण्यासाठी आणि आपल्यापासून दुसऱ्या कोणाला संसर्ग होणार नाही यासाठी वापरला जातो. मास्कच्या व्हाॅल्व्हमधून बाहेर पडणारी हवा ही फिल्टर झालेली नसते.
पुणे : कोरोना व्हायरस हा हवेतूनही पसरु शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं होतं. याच पार्श्वभूमीवर वॉल्व्ह असलेले मास्क वापरण्याबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. पुण्यातील पल्मोकेअर रिसर्च आणि एज्यूकेशन फाऊंडेशनचे संचालक डॉ. संदीप साळवी यांच्या सांगण्यानुसार एन-95 मास्क हे प्रदूषणापासून सुरक्षित राहता यावं, यासाठी बनवण्यात आले आहेत. त्यामुळे व्हॉल्व असलेला मास्क हा एन-95 मास्क जरी असेल, तरीही त्या व्यक्तीला श्वास घेताना फिल्टर हवा मिळते. पण श्वास सोडताना मात्र त्या व्हॉल्वमधून फिल्टर न झालेलीच हवा बाहेर पडते. प्रदूषित भागात काम करताना याची काही अडचण नाही. पण आता कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यापासून एन-95 मास्कचा वापर हा व्हायरसपासून स्वत:चा बचाव होण्यासाठी आणि आपल्यापासून दुसऱ्या कोणाला संसर्ग होणार नाही यासाठी वापरला जातो.
यामध्ये व्हॉल्व असलेल्या मास्कमधून श्वास घेताना येणारी हवा फिल्टर झालेली असते. पण श्वास सोडताना किंवा शिंकल्या, खोकल्यावर त्या व्हाॅल्व्हमधून बाहेर पडणारी हवा ही फिल्टर झालेली नसते. ती तशीच बाहेर पडते. त्यामुळे व्हॉल्व असलेले मास्क घातल्याने कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी होत नाही. यामुळे व्हॉल्व असलेला एन-95 मास्क घालणं टाळलं पाहिजे, असंही डॉ. संदीप साळवी यांनी सांगितलं.
कोरोनाची भारतात साथ येऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. पण या दरम्यान असे व्हॉल्व असलेले मास्क सर्रास सगळेच वापरताना दिसत आहेत. अज्ञानातून जनता हे मास्क वापरते आहे. तसेच शासनाकडूनही या मास्कच्या वापराबद्दल कोणत्याही गाईडलाइन्स जारी करण्यात आलेल्या नाहीत. असे मास्क वापरणं हे सरकार आणि जनता दोघांकडूनही झालेलं दुर्लक्ष आहे ,असं मत डॉ संदीप साळवी यांनी व्यक्त केलं. पण याचा अर्थ असा नाही की एन-95 मास्क उपयुक्त नाहीत, पण त्याला व्हॉल्व नको.तुम्ही कोणते मास्क वापरू शकता?
व्हॉल्व नसलेला एन-95 वापरण्याला हरकत नाही, असं तज्ज्ञ सांगतात. त्याचसोबत तीन लेयरचे सर्जिकल मास्कही वापरु शकता. पण सर्जिकल मास्क हा एकदाच वापरायला हवा. त्याचा परत वापर करु नये. तीन लेयर असलेले कॉटन मास्कही वापरले जाऊ शकतात. वापर झाल्यावर स्वच्छ धुवून त्याचा परत वापर केला जाऊ शकतो.
व्हॉल्व असलेला एन-95 मास्क वापरणे सुरक्षित नाही? व्हॉल्व्ह असणारा मास्क धोकादायक, तज्ज्ञांचं मत