Shrirang Barne : खासदारकीची पर्वा न करता मोदींना पाठिंबा देणाऱ्या बारणेंना विजयी करा; पनवेलच्या बैठकीत प्रशांत ठाकूरांचा निर्धार
स्वतःच्या खासदारकीची पर्वा न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणाऱ्या श्रीरंग बारणे यांना विक्रमी मताधिक्याने तिसऱ्यांदा संसदेत निवडून पाठवूयात, असा निर्धार पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला.
मावळ, पुणे : स्वतःच्या खासदारकीची पर्वा न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणाऱ्या श्रीरंग बारणे यांना विक्रमी मताधिक्याने तिसऱ्यांदा संसदेत निवडून पाठवूयात, असा निर्धार पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी महायुती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त केला. त्यासोबतच जगात भारताची मान उंचावणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मावळच्या जनतेमुळे मला मिळाली आहे, असं श्रीरंग बारणे म्हणाले. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल येथे महायुतीच्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखालीच देशाचा विकास होईल. 'सब का साथ, सब का विकास,' या मोदींच्या घोषणेवर विश्वास ठेवून खासदार बारणे यांनी ठाम भूमिका घेतली. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार याची संपूर्ण जगाला खात्री आहे. पंतप्रधान मोदी यांनी केलेली कामे सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवा आणि पनवेल विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य चिंचवडपेक्षा एका मताने तरी जास्त असले पाहिजे, असं ठाकूर म्हणाले.
जगात भारताची मान उंचावणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मावळच्या जनतेमुळे मला मिळाली आहे. रायगडच्या जनतेने मला खूप प्रेम दिले आहे. त्यामुळे कोणताही राजकीय दृष्टिकोन न ठेवता मी कामाचा ठसा उमटवू शकलो. उद्धव ठाकरे यांच्या निर्णयामुळे आम्हाला अडीच वर्षे बाजूला राहावे लागले, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार असणारी शिवसेना पुढे नेण्याचा निर्णय आपण घेतला असल्याचं श्रीरंग बारणे म्हणाले.
पनवेलमध्ये सव्वा लाख मताधिक्याचे लक्ष्य
पनवेल विधानसभा मतदारसंघातील बारणे यांचे मताधिक्य सव्वा लाखाच्या वर जाण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कंबर कसून काम करावे, असे आवाहन केलं. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे मनोमीलन झाले आहे. बारणे यांच्या रूपाने आपल्याला पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करायचे आहेत. खासदार बारणे यांचे काम बोलके आहे. आपले नाणे खणखणीत आहे. त्यामुळे आपले निशाणी 'धनुष्यबाण' घरोघर पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी अभिमानाने करावे, असेही ते म्हणाले.
'तिसरी बार, बारणे खासदार'
'अब की बार चार सौ पार' आणि 'फिर एक बार मोदी सरकार' या घोषणांबरोबरच 'तिसरी बार, बारणे खासदार' ही नवी घोषणा यावेळी देण्यात आली. समन्वयाच्या धोरणामुळे युद्धामध्ये व निवडणुकांमध्ये हे यश मिळते, हा इतिहास आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय शेवटपर्यंत राहणे आवश्यक आहे, अशी सूचना त्यांनी केली. भ्रष्टाचाराची दुकाने पूर्ण बंद करण्यासाठी, समान नागरी कायदा आणण्यासाठी, पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना 400 पेक्षा अधिक खासदारांची आवश्यकता आहे, असेही बारणेंनी सांगितले.
इतर महत्वाची बातमी-
Pune Weather Update : उकाड्यापासून पुणेकरांना काहीसा दिलासा; पुढील दोन दिवस पावसाची शक्यता