एक्स्प्लोर
मुंबई-पुणेकरांचा वेळ वाचणार, एक्स्प्रेस वेवर दोन नव्या पुलांसह बोगद्यांच्या कामाला सुरुवात
विस्तारीकरणात अमृतांजन पूल आणि संपूर्ण बोरघाट टाळून पुणे आणि मुंबई दरम्यानचं अंतर कापणं शक्य होणार आहे. त्यासाठी दोन महाकाय बोगदे आणि तेवढेच मोठे पुल बांधले जाणार आहेत.

पुणे : पुणे- मुंबई एक्स्प्रेस वेवर नेहमीच होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे एक्स्प्रेस वे खऱ्या अर्थाने एक्स्प्रेस राहिलेला नाही. मात्र ही वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारकडून एक्स्प्रेस वेच्या विस्तारीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या विस्तारीकरणामुळे मुंबई-पुणे यांमधील अंतर जवळपास 6 किलोमीटरने कमी होणार आहे. विस्तारीकरणात अमृतांजन पूल आणि संपूर्ण बोरघाट टाळून पुणे आणि मुंबई दरम्यानचं अंतर कापणं शक्य होणार आहे. त्यासाठी दोन महाकाय बोगदे आणि तेवढेच मोठे पुल बांधले जाणार आहेत. या प्रकल्पाची सुरुवात खालापूर टोलनाक्यापासून होणार आहे. सरकारने शापूरजी पालनजी या कंपनीशी निगडीत असलेल्या ऑफ कॉम या कंपनीला या कामाचं कंत्राट देण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी तब्बल 4 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या प्रकल्पातील पहिल्या पूलाची सुरुवात खोपोली एक्झिटपासून म्हणजेच खालापूर टोलनाक्यापासून होणार आहे. खोपोली एक्झिटपासून सुरु झालेला हा पूल 770 मीटर लांब आणि तब्बल 30 मीटर उंचीचा असणार आहे. या पुलावर दोन्ही दिशेने प्रत्येकी चार मार्गीका असतील. या पहिल्या पुलानंतर सुरु होणार पहिला बोगदा 1 किलोमीटर 60 मीटरचा आणि दुसरा बोगदा असेल 1 किलोमीटर 120 मीटरचा असणार आहे. Mumbai Pune Express Way | मुंबई पुण्यातील अंतर आणखी कमी होणार, नव्या दोन पुलांच्या कामाला सुरुवात | पुणे | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha या प्रकल्पातील दुसरा पूल हा सर्वात खडतर टप्पा असणार आहे. खोल दरीमध्ये हा पूल उभारला जाणार असून हा देशातला अशा पद्धतीचा पहिलाच पूल असणार आहे. या केबल स्टे पुलाची लांबी ही तब्बल 645 मीटर असेल, तर उंची तब्बल 135 मीटर असेल. तसेच प्रकल्पातील दुसरा बोगदासुद्धा आव्हानात्मक असणार आहे. प्रकल्पातील दुसरा बोगदा नागफणीच्या कड्याच्या खालून खोदला जाणारा असून तब्बल 8.9 किलोमीटर लांबीचा असणार आहे. हा बोगदा थेट लोणावळ्याच्या पलिकडे असलेल्या सिंहगड इन्स्टीट्यूटच्या समोर बाहेर पडणार आहे. या बोगद्याच्या सुरक्षेसाठी प्रत्येक अर्ध्या किलोमीटरवर आपत्कालीन बायपास ठेवण्यात आले आहेत. हा बोगदा जमिनीत सुमारे दीडशे मीटर खाली असेल. प्रकल्प पूर्ण झाल्यास काय फायदा होईल?
-
- प्रकल्पामुळे बोरघाटातली वाहतूक कोंडी कायमची संपणार आहे.
- बोरघाटातला वळणावळणाचा रस्ता कायमचा टाळता येणार आहे.
- दरडी कोसळण्याची भीती आता कायमची मिटणार आहे.
- बोरघाटातल्या अपघातांचं प्रमाण कमी होणार आहे.
- सुरळीत वाहतुकीमुळे इंधनाची, वेळेची बचत होणार आहे.
आणखी वाचा























