(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सु्प्रिया सुळे यांच्या मतदारसंघात मनसेचा झेंडा फडकवा; राज ठाकरे यांनी दिली वसंत मोरे यांना नवी जबाबदारी
पुणे ग्रामीण- मावळ, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघांसाठी पक्षाच्या निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.वसंत मोरे, सुधीर पाटसकर आणि रणजित शिरोळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पुणे : मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांना नवीन जबाबदारी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या वसंत मोरे यांना थेट सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. वसंत मोरे यांना नवी जबाबदारी देत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केल्याचे दिसून येत आहे. मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज मुंबईत पार पडली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मनसेवर नाराज असल्याचं चित्र दिसत होतं. वसंत मोरे हे पक्षाच्या कार्यक्रमात सक्रिय भाग घेत नसल्याचे दिसत होते. त्यामुळे आता वसंत मोरे यांना थेट सुप्रिया सुळे यांच्या मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्याा आदेशानुसार पुणे ग्रामीण- मावळ, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघांसाठी पक्षाच्या निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. किशोर शिंदे, हेमंत संभुस, गणेश सातपुते यांना मावळ लोकसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. अजय शिंदे आणि बाळा शेडगे यांनी शिरूर लोकसभा तर वसंत मोरे, सुधीर पाटसकर आणि रणजित शिरोळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पुणे ग्रामीण - मावळ, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघांसाठी पक्षाच्या निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. #MNSAdhikrut pic.twitter.com/56bRWkAAUe
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 22, 2022
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसाबाबत गुढीपाडव्याच्या सभेत भूमिका जाहीर केल्यानंतर निषेधाचा पहिला सूर उमटला तो त्यांच्याच पक्षातील वसंत मोरे यांच्या रुपात. त्यावेळी मनसेचे शहराध्यक्ष असलेल्या वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे आपली अडचण होत असल्याचं म्हटलं होतं. शिवाय यानंतर त्यांची मनसे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टीही झाली होती. मात्र त्यानंतर वसंत मोरेंची नाराजी दूर करण्याचा दावा मनसेकडून करण्यात आला होता.
25 ऑगस्टपासून मनसेची राज्यभर सदस्य नोंदणी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर ॲक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. आज त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तर उद्या 23 ऑगस्टला मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने या बैठकांना विशेष महत्त्व आहे. आज राज ठाकरे यांनी सदस्य नोंदणी संदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश दिले. 25 तारखेपासून राज्यभरात सदस्य नोंदणी सुरु करणार आहे. राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचे आदेश दिले आहेत. जास्तीत जास्त लोकांची नोंदणी करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत.