Maval Loksabha Constituency : मावळात श्रीरंग बारणेंचा प्रचार करणार! सुनील शेळकेंकडून यूटर्न घेण्याची तयारी!
मावळ, पुणे : मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे नको, सुरुवातीपासून अशी टोकाची भूमिका घेणारे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आता यूटर्न घेण्याच्या तयारीत आहेत.
मावळ, पुणे : मावळ लोकसभेत(Maval Loksabha Constituency) महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) नको, सुरुवातीपासून अशी टोकाची भूमिका घेणारे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) आता यूटर्न घेण्याच्या तयारीत आहेत. अजित पवारांनी मावळ लोकसभेत धनुष्यबाण चालवा, असा आदेश देत बारणेच महायुतीचे उमेदवार असतील याचे संकेत दिलेत. आता अजित दादा जे आदेश देतील, त्याचं पालन आम्ही करू. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी हेवेदावे बाजूला ठेऊ, असं म्हणत सुनील शेळकेनीं यूटर्न घेण्याची तयारी दर्शवली आहे.
मागील काही दिवसांपासून सुनील शेळकेंनी बारणेंचं टेन्शन वाढवलं होतं. त्यांच्या उमेदवारीला वारंवार विरोध दर्शवला होता. मतदारसंघातील पक्षाच्या ताकदीवर दीड लाखाच्या लीडने निव़डून येईल, असा उमेदवार मावळात आहे असेही ते म्हणाले होते. मात्र आता त्यांनी थेट य़ुटर्न घेतल्याचं दिसत आहे. आमचे सर्वेसर्वा अजित पवार आहेत. त्यांनी जी भूमिका घेतली आहे. ती भूमिकेसोबत आम्ही ठामपणाने उभे राहणार आहोत. मात्र महायुतीचा धर्म हा फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाळावा, असं नाही आहे. शिवसेना, भाजप यांनीदेखील युतीचा धर्म पाळला पाहिजे. हा धर्म पाळत असताना वरिष्ठ नेत्यांचा आदेश पाळून एकत्र काम केलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
मावळ लोकसभेचा अधिकृत उमेदवार अजून घोषित करण्यात आला नाही आहे. मात्र जो संभाव्य उमेदवार असेल त्यांचं काम करताना मोदींना पंतप्रधान करायचं आहे, याच हेतूनं महायुतीतील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी हातात हात घालून काम करायला पाहिजे, असंही ते म्हणाले.
निवडणुकीपूर्वी आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या होत्या. मावळची जागा ही राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामागची गणितं वेगळी होती. मॅजिक फिगरची माहितीदेखील पक्षाला दिली होती. मात्र महायुतीचा निर्णय आम्ही स्वीकारणार आहोत आणि उमेदवाराचा प्रचार करुन त्यांला जिंकून आणणार, असं ते म्हणाले.
बारणेंचं टेन्शन काही प्रमाणात कमी!
मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळावी, यासाठी मी अजूनही प्रयत्न करत आहे. या जागेवर अजूनही दावा सांगत आहे. मात्र जो उमेदवार असेल त्याच्यासाठी प्रामाणिक काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे बारणेंचं टेन्शन काही प्रमाणात कमी झालं आहे.
इतर महत्वाची बातमी-