Akashvani Pune : पुणे आकाशवाणीच्या बातम्या सुरुच राहणार; प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती
पुणे आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट छत्रपती संभाजीनगर हलवण्याचा निर्णयाला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्थगिती दिली आहे.
Akashvani Pune : पुणे आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट छत्रपती संभाजीनगर हलवण्याचा निर्णयाला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुणे आकाशवाणीच्या बातम्या सुरुच राहणार आहे. खासदार प्रकाश जावडेकर यांनी ठाकूर यांच्याशी संपर्क साधून या संदर्भात चर्चा केली. तसेच प्रसार भारतीचे अपूर्व चंद्र आणि मुख्य कार्यकारी अधिकारी द्विवेदी यांच्याशीही जावडेकर यांची चर्चा झाली आहे. त्यानंतर पुणे आकाशवाणी वरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट छत्रपती संभाजीनगरला हलवण्याचा निर्णय रद्द करावा, या संदर्भात जावडेकर यांनी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
खासदार प्रकाश जावडेकर सध्या तेलंगणा दौऱ्यावर असून त्यांनी या विषयासंदर्भात अनुराग ठाकूर यांच्याशी फोनवर चर्चा केली. या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. या बाबत स्वतंत्र सविस्तर चर्चा जावडेकर दिल्लीत गेल्यानंतर करणार असल्याचं जावडेकरांनी सांगितलं आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीदेखील या निर्णयाला स्थगिती द्यावी, या मागणीसाठी पत्र लिहून अनुराग ठाकूर यांना पत्र लिहिलं होतं. या दोघांच्या पाठपुराव्यामुळे आणि मागणीमुळे अनुराग ठाकूर यांनी निर्णयाला स्थगिती दिली आहे.
किती वाजता प्रसारित होतं बातमी पत्र?
आकाशवाणी पुणे केंद्रावरुन सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी पहिलं बातमीपत्र सादर केलं जातं. त्यानंतर मग आठ वाजता, दहा वाजून 58 मिनिटं आणि अकरा वाजून 58 मिनिटं, त्याचबरोबर संध्याकाळी सहा वाजता अशी बातमीपत्रं सादर केली जातात. आता पुण्याची ही सगळी बातमीपत्रं छत्रपती संभाजीनगरवरुन प्रसारित करण्याचा निर्णय प्रसार भारतीने घेतला होता. मात्र या निर्णयाला स्थागिती देण्यात आली आहे.
चंद्रकांत पाटलांचं पत्र
भारत सरकारचे अनेक मंत्री विविध सरकारी प्रकल्पांच्या शुभारंभासाठी आणि इतर कार्यक्रमांसाठी दररोज पुण्यात येतात. तसेच केंद्र सरकारच्या सूचनेनुसार जी-20 बैठकीसारखे विविध महत्त्वाचे कार्यक्रमही पुण्यात नियमितपणे आयोजित केले जातात. या कार्यक्रमांचे वृत्तांकन करून ते इतर वृत्त विभागांसह दिल्लीला पाठविण्याचे महत्त्वाचे काम या प्रादेशिक वृत्त विभागाकडून केले जाते. ते बंद करण्याच्या निर्णयामुळे पुण्यातील महत्त्वाच्या घडामोडींना बातमीपत्रात स्थान मिळण्याविषयी शंका उपस्थित होते. विशेषत: ज्येष्ठ आणि प्रतिष्ठीत नागरिकांमध्ये या निर्णयामुळे प्रचंड नाराजी आहे, असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी पत्रात म्हटलं होतं. फेरविचार करण्याचीदेखील मागणी केली होती. त्यामुळे आता पुणेकरांच्या लाडक्य़ा आजच्या ठळक बातम्या सुरुच राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी काही प्रमाणात नाराजी दूर झाली आहे.