पुण्यात निर्बंध आणखी कडक करण्याच्या प्रशासनाला सूचना : अजित पवार
अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. पुण्यात निर्बंध आणखी कडक करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
पुणे : पुण्यात निर्बंधांची कडक अंमलबजावणी झाल्यास रुग्णसंख्या नियंत्रणात येईल. त्यामुळे निर्बंध आणखी कडक करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. परंतु पुण्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्याबाबत कोणतंही भाष्य त्यांनी केलेलं नाही. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा पुरवठा, ऑक्सिजन ऑडिट तसंच फायर ऑडिट याबाबत चर्चा झाल्याचं पवार यांनी सांगितलं.
रुग्णसंख्या जास्त असलेल्या शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्याचा विचार करावा अशी सूचना हायकोर्टाने दिल्या. हायकोर्टाच्या सूचनेनंतर आज आढावा बैठक पार पडली. या बैठकीत कडक लॉकडाऊनबाबत निर्णय होणार की नाही याबाबत उत्सुकता होती. परंतु पुण्यात निर्बंध कडक करण्याच्या सूचना दिल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
या आठवड्यात चांगले परिणाम दिसत आहेत. पुण्यातील फक्त ग्रामीण भागात रुग्ण वाढले आहेत. हायकोर्टाने कडक लॉकडाऊनबाबत सूचना केली आहे. पण मला त्याबाबत जास्त काही बोलायचं नाही. पोलिसांशी आम्ही बोललो, त्यांच्या अडचणी आहेत. पुण्याच्या लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं अजित पवार म्हणाले.
18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण करायचं आहे, परंतु लसीचा तुटवडा जाणवत आहे. तसंच 45 वर्षांवरील नागरिकांना लसीचा दुसरा डोस मिळण्याची गरज आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलं. परदेशी लसीची आयात करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी द्यायला हवी, असं मतही अजित पवार यांनी नोंदवलं. तसंच लसीच्या पुरवठ्याबाबत सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पुनावाला यांच्याशी संपर्क केला. ते आणखी 10-12 दिवस तरी परतणार नाहीत, असं पवार यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या