Madhuri Misal: पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत माधुरी मिसाळ यांचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या, 'पुण्याचे पालकमंत्री कोणतेही दादा झाले तरी...'
Madhuri Misal: खातेवाटपानंतर आता सर्वत्र पालकमंत्रीपदाची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत पुण्यातील पर्वती मतदारसंघाच्या आमदार आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी भाष्य केलं आहे.
पुणे: राज्यातील मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडून जवळजवळ एक आठवडा होत आल्यानंतर काल (शनिवारी) खातेवाटप पूर्ण झालं आहे. काल( शनिवारी) हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर सर्व आमदार आपापल्या मतदारसंघात परतले आहेत. त्यानंतर आता पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र आहे. खातेवाटपानंतर आता सर्वत्र पालकमंत्रीपदाची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत पुण्यातील पर्वती मतदारसंघाच्या आमदार आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी भाष्य केलं आहे. पुण्यातील पर्वती मतदारसंघाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर काल त्या पहिल्यांदा पुण्यात आल्या. त्यांचं पुणे विमानतळावर कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आलं. आज त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, पुण्याचे पालकमंत्री कोणतेही दादा झाले तरी मला आनंदच आहे. मी दोन्ही दादांचं काम पाहिलं आहे. दोन्ही दादांनी नेहमी मला मदत केली, असं वक्तव्य माधुरी मिसाळ यांनी केलं आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, निवडणुकीत काम केलं, एवढ्या दिवसांनी मंत्रीपद मिळाले आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. त्यामुळे आनंद साजरा करत आहेत. मी कधीच कुठली अपेक्षा केली नाही. पक्ष देईल ते काम मान्य केलं आणि ते काम केलं आहे. माझ्यावर विश्वास ठेवून मला काम करायची संधी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत काम करण्याची संधी आहे. पुण्याचा डेव्हलपमेंट प्लॅन बनवणार आहोत. मला काम करायचे आहे, कोणावर नजर ठेवण्यासाठी मला काम दिलेलं नाही, मी जास्त अपेक्षा ठेवत नाही त्यामुळे अपेक्षाभंग होत नाही. पुण्याचे अनेक प्रश्न आहेत. मेट्रो रिंग रोड विमानतळ पुण्याची वाहतूक समस्या त्या सोडवायच्या आहेत, चांगलं काम करायचं आहे, असं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी म्हटलं आहे.
काल रात्री उशिरा राज्यमंत्री माधुरी मिसाळ पुण्यात दाखल झाल्या. कार्यकर्ते आणि कुटुंबियांकडून माधुरी मिसाळ यांचं जंगी स्वागत झालं. पुण्यातील पर्वती मतदारसंघातून सलग चौथ्यांदा आमदार झाल्यानंतर माधुरी मिसाळ यांना पहिल्यांदा मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. मंत्री झाल्यानंतर माधुरी मिसाळ पहिल्यांदाच पुण्यात दाखल झाल्या आहेत. पुणे विमानतळावर रात्री एक वाजता माधुरी मिसाळ दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी पेढे भरवून त्यांचं स्वागत केलं आहे.
माधुरी मिसाळ यांचा परिचय
गेल्या वीस वर्षांपासून मिसाळ पुण्यात काम करत आहेत. नगरसेविका ते आमदार आता मंत्री म्हणून माधुरी मिसाळ काम करणार आहेत. उच्चशिक्षित असणाऱ्या माधुरी मिसाळ यांच्यावर पक्षाने आता मोठी जबाबदारी सोपवली आहे. पुण्याच्या सामाजिक-राजकीय आणि पायाभूत सुविधांमध्ये परिवर्तन करण्यासाठी माधुरी मिसाळ यांचं मोलाचं योगदान आहे. कसबा मतदारसंघातून 2007 मध्ये पहिल्यांदा नगरसेविका म्हणून त्या निवडून आल्या होत्या. 2009 मध्ये त्यांना पर्वती मतदारसंघात आमदारकीचं तिकीट मिळालं. तेव्हापासून त्या पर्वती मतदारसंघाच्या आमदार म्हणून काम करत आहेत. 2009 ते 2024 अशी सलग चार वर्षे त्यांनी पर्वती मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आमदारकी मिळवली आहे.