पुण्यात ‘स्पेशल 26’; आयकर अधिकारी असल्याचं सांगून सोनाराकडून 20 लाखांची रोकड आणि 300 ग्रॅम सोने लुटले
आठ जणांनी इनकम टॅक्स ऑफिसर बनून घरावर धाड टाकली. यावेळी त्याच्या घरातील सर्व कागदपत्रे, कपाटे तपासण्याचा बहाणा करण्यात आला. घरातील 20 लाखांची रोकड आणि 300 ग्रॅम सोने सील करून सोबत घेण्यात आले.
पुणे : बॉलिवूड स्टार अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘स्पेशल 26’ या चित्रपटाप्रमाणे एका गॅंगने आयकर अधिकारी असल्याचा बहाणा करून एका सोनाराला लुटण्याचा प्रकार भारती विद्यापीठ परिसरात घडला. या गॅंगला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. अटक करण्यात आलेल्या गॅंगने 20 लाखांची रोकड आणि 300 ग्रॅम सोने लुटून पोबारा केला होता.
या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्यातील 9 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 20 लाख कॅश व 20 तोळे सोन हस्तगत करण्यात आलं आहे. भारती विद्यापीठ परिसरात एका सोनाराचा सोन्याची नथ बनवण्याचा व्यवसाय आहे. तो घरातच नथ बनवून सराफांना पुरवठा करत होता. दरम्यान त्याचा व्यवसाय वाढल्याने तो परिसरातच एक दुकान विकत घेण्याच्या विचारात होता. यामुळे त्याच्याकडे भरपूर पैसे असल्याची माहिती संबंधितांना होती.
यावरून त्यांनी त्याच्यावर नजर ठेवली आणि सोनाराला लूटण्याची एक योजना आखली गेली. अभिनेता अक्षय कुमार याचा बहुचर्चित चित्रपट ‘स्पेशल 26’ प्रमाणे आठ जणांनी इनकम टॅक्स ऑफिसर बनून त्याच्या घरावर धाड टाकली. यावेळी त्याच्या घरातील सर्व कागदपत्रे, कपाटे तपासण्याचा बहाणा करण्यात आला. घरातील 20 लाखांची रोकड आणि 300 ग्रॅम सोने सील करून सोबत घेण्यात आले.
सराफाने पोलिसांकडे धाव घेऊ नये म्हणून त्याला अपहरण करून सोबत घेण्यात आले. त्यानंतर सराफाला स्वामी नारायण मंदिरापाशी गाडीतून सोडून देण्यात आले व सर्व ऐवज घेऊन चोर पळून गेले. घाबरलेल्या सराफाने दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता भारती विद्यापीठ पोलिसांनी तत्काळ पथके तयार करून गुन्हेगारांच्या मागावर धाडली आणि रात्री उशिरा यातील काही गुन्हेगार ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेत असताना पोलिसांवर हल्ला करण्यात आला. यातील आरोपी हे पैसे कर्ज फेडण्यासाठी वापरणार होते. जर असे अनोळखी लोक अधिकारी म्हणून आले तर खातरजमा करा आणि पोलिसांना माहिती द्या, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.