(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यातील कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनाची घाई, काम अपूर्ण असताना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु या कोविड केअर सेंटरचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याचे समोर आले आहे.
पुणे : पुण्यातील बहुचर्चित जम्बो कोविड केअर सेंटरचं उद्घाटन रविवारी (23 ऑगस्ट) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु या कोविड केअर सेंटरचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काम पुर्ण न झालेल्या जम्बो कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्याची घाई मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी का केली असा प्रश्न विचारला जातोय.
पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारने दोन जम्बो कोविड केअर सेंटरची निर्मिती केली आहे. त्यातील एक पुण्यात तर दुसरे पिंपरी चिंचवड शहरात आहे. पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये 800 बेड आहेत. यामध्ये 600 बेड ऑक्सिजन तर 200 बेड हे व्हेंटिलेटर असणार आहेत.
पुण्यातील या कोविड केअर सेंटरची सुरुवातीची डेडलाईन ही 19 ऑगस्ट होती. परंतु तेव्हा पावसाचं कारण देत डेडलाईन पुढे ढकलण्यात आली होती. त्यानुसार 22 ऑगस्टला या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात. त्यावेळी दोन दिवसात हे सुसज्ज हॉस्पिटल कोरोना बाधित रुग्णांसाठी खुल करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. परंतु आज 26 तारीख उजाडली तरीही या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांचा पत्ता नसल्याचं दिसतंय.
या कोविड केअर सेंटर मध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. मोठ्या संख्येने कामगार आत मध्ये काम करताना दिसत आहेत. बेड लावले जात आहेत. दरवाजे लावले जात आहेत. अस्तव्यस्त पडलेल्या वस्तू, धुळीचं साम्राज्य पाहता अजून पुढचे काही दिवसही याच काम पूर्ण होईल असे दिसत नाही. त्यामुळे काम पूर्ण झालेलं नसतानाही प्रशासनाने या कोविड केअर सेंटरचं उद्घाटन करण्याचा घाट का घातलाय असा प्रश्न उपस्थित होतो.
Deputy CM Ajit Pawar | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची खबरदारी, पत्रकारांच्या माईकवर सॅनिटायझर केलं स्प्रे