Jayant Patil : दोन लाख पत्रिका, महिलांसाठी स्वतंत्र बैठकव्यवस्था; असा आहे जयंत पाटलांच्या मुलाच्या लग्नाचा शाही थाट
जयंत पाटलांच्या मुलाच्या विवाहासाठी दोन लाख लग्नपत्रिका, भला मोठा शामियाना, गावातील रस्तेदेखील चकाचक करण्यात आले आहेत. सोबतच या लग्नात राज्यातले नेतेमंडळीची देखील मांदीयाळी बघायला मिळणार आहे.
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांचा लग्नसोहळा उद्या (27 नोव्हेंबर) सांगलीतील इस्लामपूरमध्ये राजारामबापू साखर कारखान्याच्या राजारामनगर या परिसरात पार पडणार आहे. या लग्नाची चर्चा सध्या राज्यभर सुरु आहे. दोन लाख लग्नपत्रिका, भला मोठा शामियाना, गावातील रस्तेदेखील चकाचक करण्यात आले आहेत. प्रतीक पाटील यांच्या शाही लग्नासाठी इस्लामपुरात जय्यत तयारी करण्यात येत आहे. सोबतच या लग्नात राज्यातल्या नेतेमंडळीची देखील मांदियाळी बघायला मिळणार आहे.
जयंत पाटलांचा मुलगा प्रतिक पाटील आणि उद्योगपती राहुल किर्लोस्कर यांची कन्या अलिका किर्लोस्कर याचा विवाह उद्या संध्याकाळी गोरज मुहूर्तावर 5:35 मिनिटांनी पार पडणार आहे. त्यांच्या विवाहाची जय्यत तयारी सध्या इस्लामपुरात सुरु आहे. मागील काही दिवसांपासून या विवाहाची चर्चा राजकीय वर्तुळाबरोबरच सामाजिक पातळीवर देखील मोठ्या प्रमाणात सुरु होती. त्यामुळे या विवाह सोहळ्यात नेमकं काय बघायला मिळणार याची उत्सुकत शिगेला पोहोचली आहे.
नेते, मंत्र्यांची मांदियाळी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदार, साखर कारखान्याचे अध्यक्ष, विविध पक्षांचे राज्यपातळीवरील नेते इस्लामपुरात दाखल होण्याची शक्यता आहे. यावेळी नेमकं कोण कोण येणार आणि राजकारण विसरुन कौटुंबिक वातावरण कसं असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
तीन प्रकारच्या दोन लाख पत्रिका
या शाही विवाहाच्या सुमारे दोन लाख पत्रिकांचं वाटप करण्यात आलं आहे. त्यात तीन प्रकारच्या पत्रिकेचा समावेश आहे. मान्यवरांसाठी एक, नातेवाईकांसाठी आणि मतदारसंघातील जनतेला देण्यासाठी एक अशा तीन प्रकारच्या पत्रिका वाटण्यात आल्या आहेत. त्यामुळे लग्नात मोठ्या संख्येने लोक येणार असल्याची माहिती आहे.
एकाच वेळी पाच हजार लोक जेवतील अशी व्यवस्था
या विवाहासोहळ्यात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठा शामियाना उभारण्यात आला आहे. स्टेजसमोर मोठी बैठकव्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय महिलांसाठी वेगळ्या कक्षाची सोय करण्यात आली आहे. बियाणे मळा परिसरात भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि एकाच वेळी सुमारे पाच हजार लोकं जेवण करतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. विवाहात कोणताही अडथळा येऊ नये, म्हणून सुरक्षाही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली आहे.