राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जाती-पातीचं राजकारण वाढलं; राज ठाकरे यांच्याकडून पुनरुच्चार
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जातीच्या राजकारणाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीवर पुन्हा सडकून टीका केली आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी जातीच्या राजकारणाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीवर पुन्हा सडकून टीका केली आहे. निवडणुकीत वॉर्डनिहाय फक्त स्त्री आणि पुरुष एवढंच आरक्षण असावं, अशी भूमिका राज ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत मांडली आहे. काही दिवसांपूर्वी एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. या वक्तव्याचा राज ठाकरेंकडून पुनरुच्चार करण्यात आला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
मी प्रबोधनकार ठाकरे जसे वाचलेत तसे यशवंतराव चव्हाण देखील वाचलेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून महाराष्ट्रात जाती जातीमधे द्वेष निर्माण होत गेला. जातीपातीचे राजकारण आधीही होत होते. मात्र, राष्ट्रवादीकडून द्वेष निर्माण करण्यासाठी राजकारण करण्यात आले. महाराष्ट्रातील जनता कधीतरी विकासाच्या मुद्यावर मत देईल ही अपेक्षा. प्रबोधनकार ठाकरेंच्या लिखाणातील हवे तेवढेच घ्यायचे असं केलं जातय. यशवंतराव चव्हाणांची विचार करण्याची प्रक्रिया कशी होती हे देखील मला ठावूक आहे. मी शरद पवारांची त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुलाखत घेतली होती तेव्हा मुलाखती आधी म्हटलं होतं की काही गोष्टी आज राखून ठेवाव्या लागतील. कारण वाढदिवसाच्या दिवशी चांगलं बोलायच असतं.
निवडणुकीत फक्त स्त्री आणि पुरुष असच आरक्षण असायला हवं :
निरज चोप्रा आधी का आठवला नाही. आताच चोप्राचा चोपडे का झाला? मी बाबासाहेब पुरंदरेंकडे जातो ते इतिहास संशोधक म्हणून जातो. ब्राम्हण म्हणून जात नाही. निवडणुकीत फक्त स्त्री आणि पुरुष असच आरक्षण असायला हवं. मी काय वाचलं ते मला आणि माझ्या पक्षाला माहिती आहे. मला मोजायचा प्रयत्न करु नका. प्रबोधनकार ठाकरे तुम्हालाही परवडणारे नाहीत. त्यांनी लिहिलेलं लिखाण त्या त्या काळाच्या संदर्भात आहे. बाबासाहेब पुरंदरेंच पुस्तक पन्नास वर्षांपूर्वी प्रकाशीत झाले आहे. मग आताच त्याला विरोध का? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.