Uday Samant : विजय शिवतारेंनी अजित पवारांविरोधात शड्डू ठोकला, उदय सामंतांकडून एका वाक्यात उत्तर! श्रीरंग बारणेंवरूनही गोंधळ वाढवला
विजय शिवतारे यांनी काल सासवडमध्ये मेळावा घेत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले. आता मी खूप खूप पुढे गेलो असून माघार घेण्याचा प्रश्नच नाही असेही त्यांनी म्हटलं आहे.
Uday Samant : बारामती लोकसभेसाठी (Baramati Loksabha) सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शड्डू ठोकल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनीही जुना वचपा काढण्यासाठी बारामती लोकसभेसाठी रणशिंग फुंकले आहे. बारामती लोकसभेला त्यांनी अपक्ष उतरण्याची घोषणा केली आहे. विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर घणाघाती प्रहार केला आहे. नीच, बदला घेणार, ब्रह्मराक्षस अशा शेलक्या शब्दांचा वापर करत विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर तोफ डागली आहे. त्यामुळे बारामती जागेवरून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे का? अशी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे.
विजय शिवतारे यांनी काल सासवडमध्ये मेळावा घेत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले. आता मी खूप खूप पुढे गेलो असून माघार घेण्याचा प्रश्नच नाही असेही त्यांनी म्हटलं आहे. विजय शिवतारे यांनी घेतलेल्या भूमिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाच लक्ष लागलं असतानाच शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिल्याने विजय शिवतारे प्रकरण आता खरोखरच खूप पुढे गेलं आहे का? अशी सुद्धा चर्चा रंगली आहे.
शिवतारे यांच्याकडून होत असलेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर विजय शिवतारेंबाबत उदय सामंत यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की मला ही न झेपणारी गोष्ट असल्याची माफक प्रतिक्रिया दिली. दुसरीकडे, शिंदे गटाचे आमदार निलेश लंके सुद्धा अजित पवार गटाला रामराम करण्याची चर्चा रंगली आहे. निलेश लंके यांनी कुठं जावं हा त्यांचा प्रश्न असला तरी दक्षिण अहमदनगरचा खासदार महायुतीचाच असेल, असा दावा ही सामंत यांनी केला.
श्रीरंग बारणे कमळावर लढणार का?
दरम्यान, मावळ लोकसभेला श्रीरंग बारणे धनुष्यबाणावर लढणार की कमळावर? याबाबत संदिग्धता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कायम ठेवली आहे. माझं मन सांगतंय की श्रीरंग बारणे हेच दीड महिन्यांनी खासदार दिसतील, पण बारणे महायुतीतील कोणत्या पक्षाचे उमेदवार असतील, याची स्पष्टता सामंत यांनी केली नाही. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदे गटाची मोठी ताकद आहे. त्यामुळं हे मतदारसंघ आम्हाला सुटायला हवेत, अशी मागणी मी करत असल्याचे ते म्हणाले. याचा अर्थ मी लोकसभा लढण्यास इच्छुक आहे, असा अर्थ काढू नका, असेही ते म्हणाले.
मनसे नेत्यांच्या भेटीवर काय म्हणाले?
मनसेच्या अमेय खोपकर आणि संदीप देशपांडेंना मी भेटलो, मात्र यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असा दावा सामंत यांनी केला. मनसेला महायुतीत सामील करून दोन जागा सोडण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे.