(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवरा-बायकोचं भांडण झाल्यास नवऱ्याला इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टाईन करणार : पुणे झेडपी
लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागात कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत.
पुणे : "लॉकडाऊनच्या काळात नवरा-बायकोमध्ये भांडण झाल्यास सुरुवातीला समुदेशन करण्यात येईल. तरीही भांडण थांबलं नाही तर नवऱ्याला क्वॉरन्टाईन केलं जाईल," असा इशारा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे बहुतेक पुरुष मंडळी आपल्या घरात बसून आहे. परिणामी लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागात कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत.
लॉकडाऊनच्या काळात महिलांवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाही; गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा
...तर नवऱ्याला इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टाईन करणार! यावर तोडगा म्हणून पुणे जिल्हा परिषदेकडून प्रत्येक गावात ग्रामस्तरीय दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत ग्रामपंचायतीमधील महिला लोकप्रतिनिधी, अगंणवाडी सेविका, महिला बचत गटातील महिलांचा समावेश आहे. नवरा बायकोची भांडणं झाल्यास या समितीमधील सदस्यांकडून आधी दोघांचं समुपदेशन केलं जाईल. मात्र त्यानंतरही नवरा बायकोमधील भांडणं न थांबल्यास नवऱ्याला इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टाईन करण्यात येईल, असं पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी सांगितलं.
लॉकडाऊनच्या काळात महिलांवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत : गृहमंत्री राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याआधीच लॉकडाऊनच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. महिलांवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत, अशा इशारा त्यांनी दिला होता. ते म्हणाले होते की, "लॉकडाऊनच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही विकृत मनोवृत्तीचे पुरुष महिलांवर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारींची अतिशय गंभीर दखल घेऊन कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल."
#Corona Lockdown मुळे कुणी गैरफायदा घेऊन महिलांवर अत्याचार करत असेल तर त्यांच्या विरुद्ध अतिशय कठोर कारवाई चे निर्देश पोलीसांना दिले आहेत. आपल्या राज्यात महिलांना सुरक्षित वाटलंच पाहिजे!#ZeroToleranceOfViolenceAgainstWomen
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 12, 2020
बाहेरची गुन्हेगारी कमी, मात्र घरात हिंसाचाराच्या घटना संपूर्ण देशात लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने राज्यातही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे. परिणामी गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याची नोंद आहे. मात्र, याकाळात घरगुती हिंसाचार आणि स्त्रीयांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचारांच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याशिवाय सायबर गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे.
Domestic Violence | पत्नीसोबत भांडण केल्यास पतीला क्वॉरन्टाईन करणार : पुणे झेडपी