(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लॉकडाऊनच्या काळात महिलांवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाही; गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा
लॉकडाऊनच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. याची गंभीर दखल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
मुंबई : लॉकडाऊनच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही विकृत मनोवृत्तीचे पुरुष महिलांवर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारींची अतिशय गंभीर दखल घेऊन कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे बहुतेक पुरुष मंडळी आपल्या घरात बसून आहे. परिणामी घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत. याची गंभीर दखल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आहे.
#Corona Lockdown मुळे कुणी गैरफायदा घेऊन महिलांवर अत्याचार करत असेल तर त्यांच्या विरुद्ध अतिशय कठोर कारवाई चे निर्देश पोलीसांना दिले आहेत. आपल्या राज्यात महिलांना सुरक्षित वाटलंच पाहिजे!#ZeroToleranceOfViolenceAgainstWomen
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 12, 2020
या काळात आपल्याला कोण अटकाव करणार असा उद्दामपणा करीत महिला हिंसाचाराचे प्रकार केले जात आहेत. एकट्या स्त्रियांना त्रास देणे, त्यांचा विनयभंग करणे असे प्रकार जिथे घडतील तिथे कुठलाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाई केली जाईल. घरगुती हिंसाचाराच्या (डोमेस्टिक व्हायलन्स) घटनांचीही अतिशय गंभीर दखल घेतली जाईल. सध्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कुणीही स्त्रियांचा असा छळ केल्यास पोलिसांनी अत्यंत कठोर कारवाई करावी असे आदेश आपण दिले आहेत. सरकार अशा पीडीत स्त्रियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. घरगुती वा अन्य कोणत्याही हिंसाचाराविरुद्ध महिलांना न्याय देणारा कायदा कठोर आहे आणि त्याची अंमलबजावणी तितक्याच कठोरपणे केली जाईल. महिलांना सन्मानाची वागणूक कशी मिळेल हे पुरुष मंडळींनी बघावे. तसे न झाल्यास कायद्याचा बडगा उगारावाच लागेल, असे अनिल देशमुख म्हणाले.
Corona Update | राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1982 वर, एकट्या मुंबईत 1298 रुग्ण
बाहेरची गुन्हेगारी कमी, मात्र घरात हिंसाचाराच्या घटना संपूर्ण देशात लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने राज्यातही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे. परिणामी गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याची नोंद आहे. मात्र, याकाळात घरगुती हिंसाचार आणि स्त्रीयांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचारांच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याशिवाय सायबर गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे.
Coronavirus | मालेगावात अचानक कोरोना बाधितांचा आकडा कसा वाढला? एका दिवसात 18 रुग्ण
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1982 वर आज राज्यात 221 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1982 झाली आहे. आज राज्यात 22 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबरोबर कोविड-19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 149 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंमध्ये मुंबईत 16, पुण्यात 3 तर नवी मुंबईतील 2 आणि सोलापूरच्या एका रुग्णाचा समावेश आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 13 पुरुष तर 9 महिला आहेत. आज झालेल्या 22 मृत्यूपैकी 6 जण हे 60 वर्षांवरील आहेत तर १५ रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. तर एकजण 40 वर्षांपेक्षा लहान आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 22 पैकी 20 रुग्णांमध्ये (91 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यापैकी एकाला मलेरिया देखील होता.
Nagpur | नागपूरमध्ये रस्त्यावर जागोजागी थुंकणारा पोलिसांच्या ताब्यात, तपासणीसाठी तरूण जीएमसी रुग्णालयात दाखल