Jagdeep Dhankhar : जगदीप धनखड यांचं केंद्र सरकारला पत्र, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपूर्वीच सरकारकडे मोठी मागणी
Jagdeep Dhankhar : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणांचा दाखला देत उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. आता उद्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहे.

नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. वैद्यकीय कारणांसाठी राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी उद्या म्हणजेच 9 सप्टेंबरला मतदान होणार आहे. एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी हे रिंगणात आहेत. उपराष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानापूर्वीच जगदीप धनखड यांनी केंद्र सरकारनं राजधानी नवी दिल्लीत एक बंगला द्यावा, अशी मागणी करणारं पत्र लिहिलं आहे. ही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आवास आणि शहरी कार्य मंत्रालयाला पत्र लिहिलं आहे. याद्वारे सरकारी निवासस्थान उपलब्ध करुन द्यावं, अशी मागणी केलीय.
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड गेल्या आठवड्यात वीपी एनक्लेवमधून दक्षिण दिल्लीतील ठतरपूर येथील एका खासगी फार्महाऊसमध्ये शिफ्ट झाले आहेत. ते फार्महाऊस भारतीय लोकदलाचे नेते अभय चौटाला यांचे आहे.
सूत्रांनुसार आवास आणि शहरी कार्य मंत्रालयानं आतापर्यंत जगदीप धनखड यांना कोणताही बंगला दिलेला नाही. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार लुटियन्स दिल्ली येथील एपीजे अब्दुल कलाम मार्गावरील 34 नंबरचा टाइप-आठचा बंगला तयार असून तो जगदीप धनखड यांना दिला जाऊ शकतो. मात्र, याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. जर, धनखड यांनी ते निवासस्थान नाकारलं तर त्यांना दुसरं निवासस्थान उपलब्ध करुन दिलं जाऊ शकतं. धनखड यांनी 21 जुलै रोजी आरोग्याच्या कारणांमुळं उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता.
धनखड आणि चौटाला परिवाराचे 40 वर्ष जुने संबंध आहेत. धनखड माजी उपपंतप्रधान देवीलाल यांना गुरु मानायचे. 1989 देवीलाल यांनी धनखड यांना झुंझुनू लोकसभा मतदारसंघातून जनता दलाची उमेदवारी दिली होती. त्यानंतर जनता दलाच्या सरकारमध्ये देवीलाल उपपंतप्रधान होते त्यावेळी धनखड यांना केंद्रीय राज्यमंत्री संसदीय कार्य बनवलं होतं. धनखड यांचा उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा हा षड्यंत्र असल्याचा आरोप अभय चौटाला यांनी केला होता. त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं गेलं, असं ते म्हणाले होते.
दरम्यान, जगदीप धनखड हे 2022 उपराष्ट्रपती बनले होते. त्यांचा अजून दोन वर्षांहून अधिक कार्यकाळ शिल्लक होता. उपराष्ट्रपती होण्यापूर्वी ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. आता सत्ताधारी एनडीएनं महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. संख्याबळ पाहता ते सहज विजयी होऊ शकतात.
























