पुण्यातील बंगल्यावर नोटीस, केवळ 7 दिवसांची मुदत; IAS पूजा खेडकरांच्या अडचणीत वाढ
खेडकर कुटुंबीयांकडून पुण्यातील बाणेर भागातील त्यांच्या बंगल्याच्या बाहेर असलेल्या फुटपाथवर अतिक्रमण करण्यात आलंय. फुटपाथवर कठडे करून त्यात झाडें लावण्यात आली आहेत.
पुणे : कोट्यवधींची संपत्ती, अलिशान कार, गाडी, बंगला, फ्लॅटस आणि आरामदायी लाईफस्टाईल असतानाही नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळवलं. अंध-अपंगांच्या प्रमाणपत्रावर सनदी अधिकारी बनल्या, तरीही कार चालवून कार्यालयात जातात, विविध खोट्या प्रमाणपत्रांचा आधार घेऊन आयएएस अधिकारी बनलेल्या पूजा खेडकर यांचे अनेक कारनामे समोर येत आहेत. वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत अधिकारी होण्याचं स्वप्न पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी बाळगलं, पण त्यासाठी गैरमार्गाचा वापर केल्याचं आता समोर येत आहे. त्यातच, त्यांच्या मातोश्रींचाही एक दमदाटी करण्यात येत असल्याचा बंदुकधारी व्हिडिओ समोर आला होता. तसेच, पुण्यातील (Pune) बाणेर रोडवरील बंगल्याच्या जागेत त्यांनी अनधिकृतपणे सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचं उघडकीस आलं आहे. आता, याप्रकरणी पुणे महापालिकेनं (Mahapalika) त्यांच्या घरावर नोटीस चिटकवली आहे.
खेडकर कुटुंबीयांकडून पुण्यातील बाणेर भागातील त्यांच्या बंगल्याच्या बाहेर असलेल्या फुटपाथवर अतिक्रमण करण्यात आलंय. फुटपाथवर कठडे करून त्यात झाडें लावण्यात आली आहेत. खेडकर कुटुंबाचे एकामागोमाग एक कारनामे उघड झाल्यानंतर पुणे महापालिकेने हे अतिक्रमण काढून टाकण्याची नोटीस खेडकर यांच्या बंगल्यावर चिकटवली आहे. खेडकर कुटुंबीयांनी पुढील 7 दिवसांत अतिक्रमण काढून न घेतल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे, आता खेडकर कुटुंबीयांना 7 दिवसांत बाणेरच्या बंगल्यासमोरील अतिक्रमण हटवावे लागणार आहे, अन्यथा कारवाई अटळ आहे.
पूजा खेडकर अकोल्यात प्रकल्प अधिकारी
पूजा खेडकर ह्या पुणे इथं प्रशिक्षणार्थी काळात वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. त्यानंतर पूजा खेडकर यांना प्रशिक्षणार्थी म्हणून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर सहायक जिल्हाधिकारी म्हणून 11 जुलै रोजी रुजू झाल्या आहेत. पहिल्याच दिवशी त्यांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी एस.बूवनेश्वरी यांची भेट घेऊन वाशिमच्या जलसंपदा विभागासह 12 जुलै रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रशिक्षण घेतले. इथून पुढे आठवड्याचे पहिले दिवशी म्हणजेच सोमवार 15 जुलै पासून 19 जुलैपर्यंत अकोला येथील प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग म्हणून आठवडाभर कामकाज प्रशिक्षण करिता हजर होणार आहेत. त्यानंतर 22 जुलै पासून विविध शासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्या कामकाजाचा अनुभव घेणार आहेत.
शल्य चिकित्सकांची चौकशी व्हावी
पुजा खेडकर यांनी दिव्यांग असल्याचं सर्टिफिकेट मिळवलंय ते अहमदनगर जिल्हा रुग्णालयातुन. 2021 साली मिळवलेल्या या सर्टिफिकेटमध्ये त्यांना दृष्टीदोष असल्याचं आणि मानसिक विकलांगता असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे अहमदनगरच्या या जिल्हा रुग्णालयांतील तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांची चौकशी करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलीय.
अंध व्यक्तीचं प्रमाणपत्र कसं मिळवलं?
वादग्रस्त प्रशिक्षार्थी आयएएस अधिकारी पुजा खेडकर या दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय दृष्टीहीन संघाकडून करण्यात आली आहे. पुजा खेडकर यांनी जर अंध असल्याचं खोटं प्रमाणपत्र सादर केलं असेल तर त्यांनी एका खऱ्या अंध व्यक्तीवर अन्याय केलाय, असं या संघटनेचे सदस्य असलेल्या अंध व्यक्तींच म्हणणं आहे. एखाद्या व्यक्तीला किमान चाळीस टक्के दृष्टीदोष असला तरच त्या व्यक्तीला दिव्यंगत्वाचे प्रमाणपत्र मिळते आणि अशी व्यक्ती कार चालवणं तर दुरच, पण लिहू-वाचू देखील शकत नाही, असेही या अंध व्यक्तींच म्हणणं आहे. त्यामुळे पुजा खेडकर यांनी प्रमाणात कसं मिळवलं असा प्रश्न आता अंध संघटनेने विचारला आहे.
पूजा खेडकर यांची चौकशी
पूजा खेडकर प्रकरणी एक सदस्य समिती स्थापन करण्यात आली आहे. जर या समितीच्या तपासात खेडकर दोषी आढळून आल्या तर पूजा खेडकर यांची गच्छंती अटळ असल्याची माहिती आहे. पूजा खेडकर यांनी सादर केलेल्या दस्तावेजांची तपासणी या समिती मार्फत केली जाणार आहे. नॉन क्रिमिनल आणि मेडिकल दृष्टी दोष चाचणी कोणी केली होती, ज्या रहिवासी भागातून जे प्रमाणपत्र देण्यात आलं त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोमवार किंवा त्यानंतर या प्रकरणात कारवाई केली जाऊ शकते.