(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Rain | पुण्यात मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी पाणी साचलं
पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली. कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने अनेक सखल भागांत पाणी साचलं होतं. पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
पुणे : पुण्यात आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने काही वेळातच शहरात पाणीच पाणी झालं. शहरातील जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, प्रभात रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, अलका चौक, सिंहगड रोड, भांडारकर रस्ता परिसरात दूरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.
सखल भागात पाणी साचल्याने वाहन चालकांची तारांबळ उडाली. पुणेकरांनी पाऊस थांबून, पाणी ओसरेपर्यंत प्रवास टाळावा, असं आवाहन करण्यात आलं होतं. शहरातील सिंहगड रोड, टिळक रोड, सदाशिव पेठेसह अनेक भाग आणि उपनगरांत वीजही गायब झाली. त्यामुळे पुणेकरांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागला.
टिळक रस्त्यावर एसपी कॉलेजसमोर ग्राहक पेठ येथे झाड कोसळलं. आज झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात रस्त्यांवर झाडे कोसळण्याच्या काही घटना घडल्या. 50 हून अधिक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. कोथरुड, कर्वेनगर, एरंडवणे, लाॅ काॅलेज रोड, सहकार नगर या भागातील जास्त झाड पडल्याच्या घटना घडल्या. तर ग्राहक पेठ येथे बसवर झाड पडून एकजण गंभीर जखमी झाला आहे. शहरात पाणी तुंबण्याला पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पावसामुळे राज ठाकरेंची सभा रद्द
पुण्यात मुसळधार पावसामुळे राज ठाकरेंची सभाही रद्द झाली आहे. राज ठाकरेंची सभा ज्या मैदानात होती ते पूर्ण चिखलमय झालं. परिणामी राज ठाकरे यांना त्यांची नियोजित सभा रद्द करावी लागली आहे. सुरुवातीला राज ठाकरे यांच्या सभेसाठी पुण्यात मोठं मैदान उपलब्ध होत नव्हतं. अखेर मोठी शोधाशोध केल्यानंतर हा मैदानाचा प्रश्न मार्गी लागला. परंतु पावसाने राज ठाकरेंच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे.