Nilesh Ghaywal : निलेश घायवळला कानाखाली मारणाऱ्या पैलवानाचा भयंकर रेकॉर्ड, खून करुन तुरुंगात गेला अन् तिकडे आणखी एकाला खल्लास केलं
Nilesh Ghaywal : पैलवानाने निलेश घायवळ याला मारल्यानंतर त्याचे सहकारी मदतीला धावून आले होते. त्याने संबंधित पैलवानाला चांगलाच चोप दिला. मात्र, या सगळ्या गोंधळात हा तरुण पैलवान घटनास्थळावरुन निसटला.

पुणे: कुख्यात गुंड निलेश घायवळला काल (शुक्रवारी) मारहाण झाल्याची घटना समोर आली. घटनेचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. भूम तालुक्यातील आंदरूड गावात यात्रेनिमित्त भरवलेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये हा प्रकार घडला आहे. आंदरूड येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त ही स्पर्धा भरवण्यात आली होती. निलेश घायवळ (Nilesh Ghaiwal) याने ही स्पर्धा आयोजित केली होती. काल (शुक्रवारी) रात्रीच्या वेळी कुस्तीची स्पर्धा सुरु असताना निलेश घायवळ हा पैलवानांना भेटण्यासाठी कुस्तीच्या फडात आला होता. त्यावेळी तिथे उभ्या असणाऱ्या एका तरुण पैलवानाने निलेश घायवळच्या कानाखाली लगावली. यानंतर कुस्तीच्या ठिकाणी चांगलाच गोंधळ उडाला. पैलवानाने निलेश घायवळ याला मारल्यानंतर त्याचे सहकारी मदतीला धावून आले होते. त्याने संबंधित पैलवानाला चांगलाच चोप दिला. मात्र, या सगळ्या गोंधळात हा तरुण पैलवान घटनास्थळावरुन निसटला. दरम्यान मारहाण करणारा तरूण कोण होता, त्याने घायवळवरती हात का टाकला असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झाले आहेत.
घायवळवर हल्ला करणारा तो नक्की कोण आहे? तो कोणत्या टोळीमधला सदस्य आहे का? घायवळवरती हल्ला करण्याचा त्याचा हेतू काय होता? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित झाले आहेत. वाशी पोलिसांनी निलेश घायवळवर हल्ला करणाऱ्या सागर मोहोळकरला ताब्यात घेतलं असून त्याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
मारहाण करणारा सागर कोण?
सागर मोहोळकर असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. तो अहिल्यानगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी आहे. तो पेशाने पहिलवान असून शुक्रवारी रात्री तो धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरुड गावच्या जत्रेला उपस्थित होता. निलेश घायवळ हा फडातील पैलवानांना भेटत असताना सागर मोहोळकर हा गर्दीतून वाट काढत पुढे पोहोचला आणि त्याने थेट निलेश घायवळ याला मारहाण केली होती. या घटनेनंतर वाशी पोलिसांनी सागर मोहोळकर याच्यावर पोलिसांसमोरच हाणामारी करुन गोंधळ घालण्याचा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र, सागर मोहळकर याने निलेश घायवळ याला मारहाण का केली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु, निलेश घायवळ याच्यासारख्या दबदबा असलेल्या सागर मोहोळकरची सध्या धाराशिव आणि पुण्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.गर्दीतून वाट काढत त्याने निलेश घायवळला कानशिलात लगावल्याचा तो व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
सागर मोहोळकरचा भयंकर इतिहास समोर
वाशी पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल करत सागर मोहोळकरला ताब्यात घेतलं आहे. वाशी पोलीसांकडून त्यांची कसून चौकशी करत आहे. पोलीस तपासात सागर मोहोळकरचा भयंकर इतिहास समोर आला आहे. तो कुस्तीच्या फडासह गुन्हेगारी क्षेत्राचा पक्का खिलाडी असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. कारण त्याच्यावर याआधी खुनाचे दोन गुन्हे दाखल असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. काही वर्षांपूर्वी सागर मोहोळकरला एका खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात केलेली होती. त्याला तुरुंगवास देखील झाला होता. खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असताना सागरने तुरुंगात आणखी एकाचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. यासंबंधीचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

















