Guillain Barre Syndrome: राज्यातील जीबीएस सिंड्रोमची रुग्णसंख्या 197 वर, 20 ते 29 वयोगटातील तरुणांना जास्त धोका
Guillain Barre Syndrome: राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome)च्या एकूण रुग्णसंख्येपैकी सर्वात जास्त रूग्णसंख्या 42 रुग्ण हे 20 ते 29 वर्षे वयोगटांतील आहेत.

पुणे: पुण्यासह राज्यभरात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) या आजाराच्या पाच नव्या रुग्णांची काल (मंगळवारी, ता- 11) नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 197 वरती पोहोचली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे जीबीएसमधून बरे झालेल्या 104 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार, 92 रुग्ण हे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत. तसेच, 40 रुग्ण पुणे मनपा, 29 रुग्ण पिंपरी-चिंचवड मनपा, 28 रुग्ण पुणे ग्रामीण हद्दीतील आणि आठ रुग्ण इतर जिल्ह्यांमधील आहेत. सध्या 50 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून, 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
जीबीएसचे प्रमाण तरुणांमध्ये सर्वाधिक
राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome)च्या एकूण रुग्णसंख्येपैकी सर्वात जास्त रूग्णसंख्या 42 रुग्ण हे 20 ते 29 वर्षे वयोगटांतील आहेत. त्याखालोखाल 50 ते 59 वर्षे वयोगटांतील मुलांचे प्रमाण 28 टक्के इतके आहे. या आकडेवारीनुसार, तरुणांमध्ये या आजाराचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर 40 ते 49 वर्षे वयोगटांतील 27, 10 ते 29 वर्षे वयोगटांतील 23, 30 ते 39 वर्षे वयोगटांतील 23, 60 ते 69 वर्षे वयोगटांतील 21, 70 ते 80 वर्षे वयोगटांतील सहा आणि 80-89 वर्षे वयोगटांतील चार रुग्णांचा समावेश आहे.
पुणे शहरामध्ये जानेवारी महिन्यापासून गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. 'जीबीएस'चा प्रसार दूषित पाण्यातून झाला असल्याचं 'एनआयव्ही'च्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. दूषित पाण्यामुळे रुग्णांना उलट्या, जुलाब, थकवा अशी लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात पाहायला मिळत आहेत. 'जीबीएस'मध्ये शरीराच्या प्रतिकारशक्तीवर हल्ला होतो. 'गुलेन बॅरी सिंड्रोम'ची (जीबीएस) बाधा ही 'कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी' हा जिवाणू आणि नोरोव्हायरस या विषाणूमुळे झाल्याचे उघड झाले आहे.
काय आहेत जीबीएसची लक्षणं?
जिवाणू अथवा विषाणू संसर्ग झाल्यानंतर रुग्णांमध्ये त्यांची प्रतिकारशक्ती जिवाणूऐवजी शरीरातील चेतासंस्थेवर हल्ला करते. त्यांना 1 ते 3आठवड्यांनी गुलेन बॅरी सिंड्रोम होतो. जीबीएस हा चेतासंस्थेशी निगडित विकार आहे. यामध्ये शरीरातील प्रतिकारशक्तीच चेतासंस्थेवर हल्ला करते. त्यातून हात, पाय, गळा, तोंड आणि डोळे या भागात अशक्तपणा जाणवतो. हातापायाला मुंग्या येणे अथवा ते बधिर पडणे अशी लक्षणे दिसून येतात. जीबीएसच्या रूग्णांना चालण्यासाठी, अन्न गिळण्यासाठी आणि श्वास घेण्यासाठी अडचणी येतात. या विकारावर लक्षणांनुसार उपचार केले जातात. आयव्हीआयजी इंडेक्शन अथवा प्लाझ्मा बदलणे असे उपचार केले जातात. या विकाराचा रुग्ण योग्य उपचारानंतर बरा होतो.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























