Tarkarli Beach: पुण्यातील पाच पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू; मृत दोघे मामा-भाचे, कुटुंबांवर दुःखाचा डोंगर
Tarkarli Beach: तारकर्ली समुद्रात पुण्यातील पर्यटक फिरण्यासाठी आले होते. पण पाण्यात गेलेल्यांचा समुद्रातील खोलीचा अंदाज चुकला आणि दुर्दैवी घटना घडली आहे.

पुणे: पुण्यातील हडपसर परीसरामध्ये राहणारे 5 जण तारकर्ली येथे पर्यटनासाठी गेले होते, त्यातील दोन युवकांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल घडली आहे. यातील एका गंभीर जखमी युवकावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना काल (शनिवारी, ता 22) सकाळी तारकर्ली एमटीडीसीजवळील समुद्रकिनाऱ्यावर घडली आहे. रोहित बाळासाहेब कोळी (वय 21) व शुभम सुनील सोनवणे (22) अशी मृतांची नावे आहेत, तर कुश गदरे, रोहन डोंबाळे (20), ओंकार भोसले यांना समुद्रातून बुडताना वाचवण्यात यश आलं आहे,या तिघांवर उपचार सुरू आहेत.
समुद्रात खोलीचा अंदाज न आल्याने मृत्यू
समुद्रात गेल्यानंतर अचानक पाण्याच्या खोलीचा व लाटांचा अंदाज न आल्यामुळे पोहत असलेल्या युवकांपैकी ओंकार भोसले, रोहित कोळी, शुभम सोनवणे हे पाण्यात ओढले गेले. ते बुडत असल्याचं दिसताच स्थानिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केलं.
मृत्यू झालेले दोघे मामा-भाचे
तारकर्ली येथील समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या पाच जणांपैकी दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेले दोघे मामा भाचे असल्याची माहिती आहे. उरुळी देवाची येथील दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उरुळी देवाची येथे राहणारे पाच युवक मालवणला परवा फिरण्यासाठी गेले होते. शनिवारी (दि. 22) सकाळी तारकर्ली येथे फिरण्यासाठी गेले होते. साडेअकराच्या दरम्यान समुद्रात पाच जण पोहण्यासाठी गेले असता, दोन जणांचा बुडून मृत्यू, तर एकजण जखमी झाला आहे. शुभम सुशील सोनवणे हा कॉलेज सोबतच लॅबोरेटरीत काम करत होता. त्याचे वडील टेलर काम करीत आहेत, तर रोहित बाळासाहेब कोळी हा मांजरी येथील महाविद्यालयात शिकत असून, त्याचे वडील रिक्षा चालवतात. या दोन्ही कुटुंबांत असणारा एकुलता एक मुलगा गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
उपचार सुरू
दरम्यान, डॉक्टरांनी तपासणी केली असता रोहित कोळी व शुभम सोनवणे यांना मृत घोषित केले. मात्र, ओंकार भोसले हा अत्यवस्थ असून, त्याला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. ओंकारची ऑक्सिजनची पातळी वाढलेली दिसत नसल्याने तो धोक्याबाहेर आला असे म्हणता येणार नाही, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
समुद्रात शोधकार्य
स्थानिकांनी तत्काळ समुद्राच्या पाण्यात बचावकार्य सुरू केले. बचाव कार्यात समीर गोवेकर, वैभव सावंत, दत्तराज चव्हाण, महेंद्र चव्हाण, रांजेश्वर वॉटर स्पोर्टचे कर्मचारी सामील झाले होते. समुद्राच्या पाण्यात शोधकार्य सुरू असताना बुडालेल्या अवस्थेत तीनही युवक सापडले. त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

