विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरु होण्यासाठी स्मार्टफोन दान करा, पुणे जिल्हा परिषदेचं आवाहन
जर या विद्यार्थ्यांना ही साधनं उपलब्ध करुन दिली नाहीत तर ते ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहतील. यामुळे या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेकडून काही प्रयत्न केले जात आहेत.
पुणे : कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या शाळा सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे शाळांकडून ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. पण सगळ्याच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणं शक्य नाहीये. याचं प्रमुख कारण म्हणजे की त्यांच्याजवळ स्मार्टफोन, लॅपटॉप यांसारख्या साधनांचा अभाव आहे आणि इंटरनेटची सुविधाही उपलब्ध नाही. यामुळे शैक्षणिक वर्ष सुरु झालं तरीही पुणे जिल्ह्यातील तब्बल 1 लाख विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरुच झालेलं नाही.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या पुणे जिल्ह्यात एकूण 3 हजार 600 प्राथमिक शाळा आहेत. यामध्ये 2 लाख 32 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. यापैकी 1 लाख 30 हजार विद्यार्थ्यांकडे किंवा त्यांच्या कुटुंबात कुणाकडे स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर यापैकी कोणतं तरी एक साधन उपलब्ध आहे. पण जवळपास 1 लाख असे विद्यार्थी आहेत की त्यांच्या घरी कोणतंही साधन उपलब्ध नाही. साधा स्मार्टफोनही उपलब्ध नाही. आयूष प्रसाद सांगतात की, जर या विद्यार्थ्यांना ही साधनं उपलब्ध करुन दिली नाहीत तर ते ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहतील. यामुळे या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेकडून काही प्रयत्न केले जात आहेत.
ऑनलाईन शिक्षणाचा 'व्हीस्कूल पॅटर्न', महाराष्ट्रातील दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण
यासाठी त्यांनी स्मार्टफोन दान करा, अशी विनंती लोकांना केली आहे. तसेच ग्रामपंचायत आणि सेवा केंद्रात उपलब्ध असलेल्या कॉम्प्यूटरचा वापर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी करु द्यावा असे आदेश जिल्हा परिषदेकडून देण्यात आले आहेत. भोर, वेल्हे आणि आंबेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये इंटरनेट नाही. काही गावांमध्ये तर 2 जी नेटवर्कही येत नाही. अशा 460 ग्रामपंचायतींमध्ये येत्या 15 ऑगस्टपासून राऊटर्सच्या वापरातून वायफायची सेवा सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचंही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं.
पण या सर्व परिस्थितीमध्ये दिलासादायक गोष्ट अशी की संपूर्ण जिल्ह्यात पाठपुस्तकांचं वाटप पूर्ण झालं आहे. त्यामुळे मोठ्या इयत्तांमधील विद्यार्थी थोडा स्वत: अभ्यास करु शकतील. ऑनलाईन शिक्षणामुळे आर्थिक आणि सामाजिक दुर्बल घटकांमधील शिक्षणाची दरी वाढत तर जाणार नाही ना, अशी भीती व्यक्त होते आहे.