Pune Crime News: लिफ्टमधून खाली जात असताना कुत्रा चावला; कुत्रा मालकावर गुन्हा दाखल
पुण्याच्या हडपसर परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत एका कुत्र्यामुळे पुन्हा वाद निर्माण झालाय. लिफ्टमधून खाली उतरत असताना कुत्रा चावल्याने एका महिलेने पोलिसात तक्रार दिली.
Pune Crime News: पुण्याच्या हडपसर परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत एका कुत्र्यामुळे पुन्हा वाद निर्माण झालाय. लिफ्टमधून खाली उतरत असताना कुत्रा चावल्याने एका महिलेने पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार या कुत्र्याची मालक असणाऱ्या महिला विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राशी अभिषेक सक्सेना (वय 44) त्यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार मनीषा सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार 20 जुलै रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मगरपट्टा रोड परिसरातील कुमारसीयना या सोसायटीमध्ये घडला.
नक्की काय घडलं?
44 वर्षीय राशी अभिषेक सक्सेना या मगरपट्टा रोड परिसरातील कुमारसीयना या सोसायटीमध्ये राहतात. त्या कामानिमित्त लिफ्टमधून खाली जात होत्या त्यावेळी मनीषा सिंग यांच्या घरी असलेल्या पाळीव कुत्र्यांने त्यांना चावा घेतला. कुत्र्याचा त्रास होत आहे. त्याला नीट ठेवा असं त्यांनी आधीच कुत्राच्या मालकाला सांंगितलं होतं. मात्र मालकांनी त्या कुत्र्याबाबत काहीच अॅक्शन घेतली नाही. 20 जुलैला राशी संध्याकाळी कामानिमित्त लिफ्टमधून खाली उतरताना सात वाजताच्या सुमारास त्यांंना कुत्र्याने चावा घेतला. या सगळ्या प्रकाराला वैतागून त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मनीषा सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उच्चभ्रू सोसायटीत अनेकांना वेगवेगळ्या जातींची कुत्रे पाळण्याचा छंद असतो. त्यात विदेशी जातींची कुत्रे देखील असतात. कुत्री सांभाळत असताना किंवा पाळत असताना शेजारच्यांना किंवा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या असं कायम सांगण्यात येतं. मात्र या नियमाचं पालक होताना दिसत नाही. संध्याकाळी अनेक लोक आपले कुत्रे बाहेर फिरायला घेऊन जातात. मात्र यावेळी नागरिकांना या कुत्र्यांच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. आतापर्यंत अनेक शहरात अशा कुत्रा चावल्याच्या घटना घडल्या आहेत. कुत्र्यांना नीट ठेवणं ही मालकाची जबाबदारी असते त्यामुळे अनेकदा अशा प्रकरणात मालकांवर गुन्हा दाखल केला जातो.