(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल करून पैश्यांची मागणी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल करून पैश्यांची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाजात बोलून व्यवहारात पैश्यांची मागणी केल्याचं समोर आलंय. यामुळं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी प्रताप खंडेभराड यांच्या फिर्यादीवरुन पुण्याच्या चाकण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी धीरज पठारे गुरव नामक व्यक्तीशी शरद पवारांच्या आवाजात बोलला आहे. तर किरण काकडे याने पवारांचा पीए असल्याचं भासवले. व्याजाने घेतलेल्या पैशातून हा प्रकार घडलाय.
एक कोटींहून अधिकची रक्कम प्रताप यांना धीरज यांनी 2014 मध्ये दिली. त्यात व्याज लाऊन साधारण पाच कोटींच्यावर रक्कम मागत होता. त्यापोटी त्यांनी तेरा एकर जमीनही घेतली. तरीही तो पैशाची मागणी करत राहिला. ते देत नसल्याने शेवटी त्याने शरद पवारांच्या आवाजाचा आधार घेतला. यासाठी सॉफ्टवेअरचा आधार घेत पवारांच्या मुंबई येथील लँडलाईन नंबरवरून कॉल केल्याचं दाखवलं आणि गुरव करवी त्यांचा आवाज काढून पैशांचीही मागणी केली. याप्रकरणी एक गुन्हा मुंबईत तर दुसरा गुन्हा चाकणमध्ये दाखल झाला आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली. गुन्ह्यातील तिघांना मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस त्यांना ताब्यात घेणार आहे.
मंत्रालयातही शरद पवारांच्या आवाजात फोन करुन पैशांची मागणी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल करून थेट मंत्रालयातही फोन करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. बदल्यासंदर्भात सिल्वर ओकमधून शरद पवार यांच्या नावाने बोलत असल्याचा बनावी फोन मंत्रालयात करण्यात आला आहे. याप्रकरणी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास खंडणी विरोधी पथकाकडून सुरू असून एकाला ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.