Datta Khade: वाल्मिक कराडचं पुणे कनेक्शन, भाजपचा नेता अडचणीत; CID कडून अडीच तास चौकशी
Datta Khade on CID inquiry: आता वाल्मिक कराडने त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे फर्ग्युसन महाविद्यालयात समोरची मालमत्ता खरेदी केली आहे, त्या प्रकरणात सीआयडी कडून दत्ता खाडे यांची चौकशी करण्यात आली आहे.
पुणे: बीड जिल्ह्यातील खंडणीच्या गुन्ह्यातील संशयित वाल्मिक कराड (Walmik Karad) प्रकरणात पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे (Datta Khade) यांची काल (सोमवारी ता.20) राज्य गुन्हे अन्वेषणकडून (सीआयडी) चौकशी करण्यात आली. सध्या वाल्मिक कराड (Walmik Karad) 'सीआयडी'च्या कोठडीत आहे. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मकोका) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. कराडने त्याच्या पत्नीच्या नावावर पुण्यात काही ठिकाणी फ्लॅट, ऑफीस स्पेसेस अशी कोट्यावधी रूपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. ही बाब 'सीआयडी'च्या चौकशीत समोर आली आहे. या व्यवहारात भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे (Datta Khade) यांनी मध्यस्थी केल्याचा संशय 'सीआयडी'ला आहे. या पार्श्वभूमीवर 'सीआयडी'च्या विशेष पथकाने खाडे (Datta Khade) यांना बीड येथे बोलावून घेतले. या विशेष पथकाने खाडे यांची चौकशी केली.
काय म्हणाले दत्ता खाडे?
दत्ता खाडे (Datta Khade) हे पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक आहेत. गोपीनाथ मुंडे पासून ते भाजपामध्ये कार्यरत आहेत. आता वाल्मिक कराडने त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे फर्ग्युसन महाविद्यालयात समोरची मालमत्ता खरेदी केली आहे, त्या प्रकरणात सीआयडी कडून दत्ता खाडे यांची चौकशी करण्यात आली आहे. त्याबाबत त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला, त्यावेळी बोलताना ते म्हणाले, वाल्मिक कराड आणि माझी (दत्ता खाडे) फक्त तोंड ओळख आहे. मी कधीही त्यांच्यासोबत फोनवर बोललेलो नाही. या प्रकरणाशी माझं काहीही संबंध नाही, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.
सीआयडी कडून 19 तारखेला मला नोटीस आली आणि मला सीआयडी कडून बोलवण्यात आलं. जवळपास दोन अडीच तास चौकशी झाली. वाल्मिक कराडने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर जी मालमत्ता घेतली आहे, त्यावेळी मी बिल्डरला पैसे कमी करायला सांगितले का? माझ्याकडून काही पैशाचा व्यवहार झाला का? माझे आणि वाल्मिक कराडचे काही संबंध आहेत का? असे अनेक प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विचारण्यात आले. मात्र, यात माझा काहीही संबंध नाही. ज्या प्रभागात ही मालमत्ता येते त्या प्रभागाचा मी नगरसेवक आहे. माझं याच्याशी काहीही संबंध नाही. निवडणुकीच्या तोंडावर मला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, असा दावा देखील खाडे यांनी यावेळी केला आहे.
पुण्याच्या फर्ग्युसन रोडवर वाल्मिक कराडची प्रॉपर्टी
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोरील एका इमारतीत वाल्मिक कराडच्या जवळच्या व्यक्तिच्या आणि त्याच्या दुसऱ्या 25 कोटी रुपये खर्चून सहा ऑफिस स्पेसेस विकत घेतल्याचा दावा करण्यात आलेला होता. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या बरोबर समोर काम सुरु असलेल्या असलेल्या एका इमारतीत वाल्मिक कराड, त्याच्याशी संबंधित एक महिला आणि विष्णू चाटेच्या नावे सहा ऑफिस स्पेसेस बुक करण्यात आल्या असल्याची माहिती काही दिवसांपुर्वी समोर आली होती.