PCMC Election 2026: पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; अजितदादांना 110, शरद पवारांच्या वाट्याला 18 जागा; प्रभाग 9 अन् 20 च्या लढतीबाबतही मोठी अपडेट
PCMC Election 2026: दोन्ही राष्ट्रवादींच्या स्थानिक नेतृत्वामध्ये यासंदर्भात सकारात्मक वातावरण असून, एकत्र लढून शहरातील सत्तेत येणे, हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचंही यावेळी सांगण्यात येत आहे.

पिंपरी : राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे, अशातच पुण्यासह पिंपरी चिंचवड (Pune, PCMC) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी (Both NCP) एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील सत्ता समीकरणे लक्षात घेऊन दोन्ही गटांनी काल (सोमवारी,ता29) जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला निश्चित केला असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही राष्ट्रवादीनी ठरवलेल्या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादी (शरद पवार) (NCP SP) १८ जागांवर उमेदवार उभे करणार असून उर्वरित ११० जागांवर राष्ट्रवादी (अजित पवार) कडून उमेदवारी देण्यात येणार आहे. दोन्ही राष्ट्रवादींच्या स्थानिक नेतृत्वामध्ये यासंदर्भात सकारात्मक वातावरण असून, एकत्र लढून शहरातील सत्तेत येणे, हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचंही यावेळी सांगण्यात येत आहे.
विशेष बाब म्हणजे पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक ९ आणि २० मध्ये दोन्ही गटांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. यादरम्यान, इतर प्रभागांमध्ये उमेदवार निवड, आढावा प्रभागनिहाय आणि प्रचारयंत्रणेची आखणी सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही गटांच्या संयुक्त बैठका, स्थानिक नेत्यांशी चर्चा आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आज मंगळवारी (दि.३०) अंतिम यादी जाहीर होणार असून, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचाराला वेग येणार आहे.
PCMC Election 2026: दोन प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढत
प्रभाग ९ आणि २० मध्ये स्थानिक समीकरणे, इच्छुकांची संख्या आणि संघटनात्मक ताकद लक्षात घेऊन स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांचे पॅनेल उभे राहणार असल्याने याचा फटका दोन्ही पक्षांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याचे स्पष्ट झाले असून राष्ट्रवादीला (शरद पवार) १८ जागा देण्यात येणार आहेत. प्रभाग ९ आणि २० मध्ये मैत्रीपूर्ण लढत करण्याचे ठरले आहे, अशी माहिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिली आहे.
PCMC Election 2026: प्रभाग ९ आणि प्रभाग २० मैत्रीपूर्व लढत होणार
अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष योगेश बहल, यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२८ पैकी पिंपरीमध्ये १८ जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला म्हणजेच तुतारीला देण्यात आल्या आहेत. प्रभाग ९ आणि प्रभाग २० मैत्रीपूर्व लढत होणार आहे. शरद पवार गटाचे ४ उमेदवार अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.
























