स्टॅम्प ड्युटी भरण्याइतके तरी व्हाईट पैसे आहेत का? चंद्रकांत पाटलांचा हसन मुश्रीफांना टोला
हसन मुश्रीफांनी 127 कोटींचा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप किरीट सोमय्या यांनी केला. या आरोपांना हसन मुश्रीफ यांना उत्तर देताना किरीट सोमयांवर 100 कोटींचा अब्रुनुकसांनीचा दावा करणार असल्याचं म्हटलंय.
पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी 127 कोटींचा घोटाळा केल्याचा दावा केला आहे. किरीट सोमया यांच्या आरोपांना उत्तर देताना हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांवरही टीका केली होती. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, मुश्रीफ यांचा घोटाळा समोर आलाय. माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. माझे ते मित्र आहेत. माझं नाव घेतल्याने त्यांना झोप लागणार असेल तर त्यात मला आनंदच आहे.
किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. त्यांनी 100 नाही 500 कोटींचा दावा दाखल करावा. त्यासाठी लागणारी स्टॅम्प ड्युटी त्यांना भरावी लागेल. ती स्टॅम्प ड्युटी मात्र व्हाईट मनीने भरावी लागते. तेवढी व्हाईट मनी तुमच्याकडे आहे का? असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगवाला.
मी आणलेल्या हॅम प्रकल्पात भ्रष्टाचार केल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे. मग 19 महिने काय झोपले होते का? कोरोना काळात काळा पैसा गोळा करण्यात व्यस्त होतात का? असा सवाल चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय असा आरोप त्यांनी केला. त्यांचं सरकार फेव्हिकोलचं सरकार आहे. मग कशाला एवढी भीती वाटते, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं.
काय म्हणाले हसन मुश्रीफ?
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांनी मनी लॉन्ड्रिंग आणि बेनामी व्यवहारांद्वारे 127 कोटींचा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यानंतर तत्काळ पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीप यांनी किरीट सोमय्यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून त्यांच्यावर फौजदारी अब्रू नुकसानीचा 100 कोटींचा दावा दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे. हसन मुश्रीफ म्हणाले की, "माझ्या पक्षांच्या विरुद्ध आणि आमच्या नेत्यांच्या विरुद्ध बिनबुडाचे खोटे आरोप केले जात आहेत. किरीट सोमय्या यांच्या CA च्या पदवीवर संशय येतोय. माझ्या घरावर आणि कारखान्यावर इनकम टॅक्सची धाड पडली होती, त्यावेळी त्यांना काहीही सापडलं नव्हतं. किरीट सोमय्यांना बिचाऱ्यांना काहीही माहिती नाही. बहुतेक चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनी काहीही तरी चुकीची माहिती दिली असेल. वास्तविक त्यांनी माहिती घ्यायला हवी होती. ते जर आले असते तर त्यांना स्पष्टपणे कळालं असतं, खरं काय आहे."
संबंधित बातम्या