Pune Political News: भोसरी विधानसभेचा केसरी कोण होणार? भाजपच्या महेश लांडगेंसोबत रवी लांडगेंची की अजित गव्हाणेंची कुस्ती होणार?
Pune Political News: पिंपरी चिंचवडमधील भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगेनी मशाल हाती घेतली, त्यामुळं भोसरी विधानसभेच्या आखाड्यात महाविकासआघाडीत रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र दिसून येत आहे.
Pune Political News: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील सर्वच पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. मात्र, आगामी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसून लागली आहे. अशातच महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये आपापल्या मित्रपक्षांसोबत लढणार असल्याने अधिकचा पेच निर्माण झाला आहे. यामुळे पक्षांची आणि वरिष्ठांची डोकेदुखी देखील ठरण्याची शक्यता आहे, याच कारण म्हणजे पिंपरी चिंचवडमधील भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगेनी (Ravi Landge) मशाल हाती घेतली, त्यामुळं भोसरी विधानसभेच्या आखाड्यात महाविकासआघाडीत रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र दिसून येत आहे.
भोसरी विधानसभेचा केसरी होण्यासाठी आता पैलवान तयारीला लागलेत. या आखाड्यात भाजपचे आमदार पैलवान महेश लांडगेंना चितपट करण्याचं उद्धिष्ट महाविकास आघाडीने बाळगलं आहे. पण पैलवान महेश लांडगेंच्या विरोधात ठाकरेंचा पैलवान रवी लांडगे की शरद पवारांचा पैलवान अजित गव्हाणेंना (Ajit Gavhane) आखाड्यात उतरवलं जाणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. पण रवी लांडगेंच्या प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंनी भोसरी विधानसभेवर भगवा फडकविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळं भोसरीत मशाल पेटविण्यासाठी रवी लांडगे (Ravi Landge) तयारीला लागलेत.
माजी नगरसेवक रवि लांडगे यांचा ठाकरे गटात प्रवेश
भाजप पक्षात आपल्या पदांचा राजीनामा दिल्यानंतर दोन वर्ष कोणतीच राजकीय भूमिका न घेतलेले आणि भोसरीतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले माजी नगरसेवक रवि लांडगे (Ravi Landge) यांनी काल (मंगळवारी) शिवसेना (ठाकरे) या पक्षात प्रवेश केला. लांडगे यांच्या या पक्षप्रवेशामुळे विधानसभा लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेल्या अजित गव्हाणे यांच्यासमोर आव्हान असणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. रवि लांडगे यांच्या प्रवेशानंतर आता भोसरीतील महाविकास आघाडीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
भोसरी मतदारसंघ शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे गट यांचा दावा
2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना-भाजप युतीमध्ये भोसरी मतदारसंघ हा शिवसेनेकडे होता. 2009 आणि 2014 मध्ये शिवसेनेकडून सुलभा उबाळे यांनी या मतदार संघामधून निवडणूक लढवली होती. मात्र, यामध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2019 मध्ये हा मतदारसंघ भाजपने लढवला. या मतदार संघावर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना ठाकरे गट या दोन्ही पक्षांनी दावा ठोकला आहे. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. तर भाजपला दोन वर्षाआधी सोडचिठ्ठी दिलेले रवि लांडगे काल ठाकरे गटात गेले आहेत. त्यामुळे आता कोणाला हा मतदारसंघ मिळणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.