एक्स्प्लोर
संत तुकारामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या डोंगराला सुरुंग, वारकऱ्यांचं आंदोलन
संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भामचंद्र आणि भंडारा डोंगराला विकासकामांच्या नावाखाली सुरुंग लावला जात असल्याचा आरोप वारकऱ्यांनी केला आहे.

पुणे : संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भामचंद्र आणि भंडारा डोंगराला विकासकामांच्या नावाखाली सुरुंग लावला जात असल्याचा आरोप वारकऱ्यांनी केला आहे. याप्रकरणी पुणे जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर वारकऱ्यांनी भजन करत आंदोलन केलं. भामचंद्र डोंगराच्या समोरच्या बाजूला चाकण एमआयडीसीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जमिनी संपादित करताना डोंगराचा पायथाही पोखरण्यात आला आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या हजारो झाडांची कत्तलही करण्यात आली आहे. तसेच भामचंद्र डोंगराच्या पाठीमागचा भाग खाजगी मालकीचा असल्याने विकासकांनी तो ताब्यात घेऊन तिथेही डोंगर पोखरला आहे. सरकारने चाकण एमआयडीसीमधील जमिनी औद्योगिक कंपन्यांना देताना त्यातून भामचंद्र डोंगरला वगळावे. तसेच भामचंद्र डोंगराच्या पाठीमागच्या खाजगी जमिनी सरकारने संपादित करुन तुकोबारायांचा वारसा जतन करावा, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून संतभूमी संरक्षक संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केलं आहे. पाच-सहा दिवसांपासून वारकरी याठिकाणी आंदोलन करत आहेत मात्र आंदोलनाची साधी दखलही शासनानं घेतली नाही. याआधीही वारी मार्गात येणाऱ्या डाऊ केमिकल कंपनीला वारकऱ्यांनी उधळून लावलं होतं. आताही वारी तोंडावर असल्याने वारकऱ्यांच्या आणखी एका उठावाला सरकारला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. ज्या भामचंद्र आणि भंडारा डोंगरासाठी वारकऱ्यांना आंदोलन सुरु केलं आहे त्याच डोंगरावर तुकोबारायांना विठ्ठलाचा साक्षात्कार झाला होता. याच डोंगरावर तुकोबारायांनी असंख्य अभंगांची रचना केली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
पुणे
भारत
महाराष्ट्र























