आज "मी राज्याचा उप...", विरोधी पक्षनेता म्हणून बोलतोय, अजित पवार गोंधळले
Ajit Pawar : बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना अजित पवार सवयीप्रमाणे स्वत:चा उल्लेख 'राज्याचा उपमुख्यमंत्री' असा करत होते. परंतु हा शब्द पूर्ण करण्यापूर्वीच ही बाब त्यांच्या लक्षात आली आणि 'विरोधी पक्षनेता' असा उल्लेख करत बाजू सावरली.
Ajit Pawar : आयुष्यात होणारा मोठा बदल स्वीकारण्यासाठी आपला अनेकदा गोंधळ उडतो. असाच गोंधळ आज राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा पाहायला मिळला. बारामतीमध्ये (Baramati) माध्यमांशी बोलताना अजित पवार सवयीप्रमाणे स्वत:चा उल्लेख 'राज्याचा उपमुख्यमंत्री' (Deputy CM)असा करत होते. परंतु हा शब्द पूर्ण करण्यापूर्वीच ही बाब त्यांच्या लक्षात आली आणि 'विरोधी पक्षनेता' (Opposition Leader) असा उल्लेख करत बाजू सावरली.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस यांचं सरकार येऊन आता एक महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. महाविकास आघाडीमध्ये अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपद होतं. सध्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे आहेत.
...आणि अजित पवार गोंधळले
अजित पवार आज पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये होते. यावेळी अजित पवार यांना परमबीर सिंह वसुली प्रकरणात निलंबित डीसीपी पराग मनेरे यांचं निलंबन रद्द करुन त्यांना पुन्हा सेवेत घेतल्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. यावरच उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, "मला त्यासंदर्भात काही माहिती नाही. मी कालपासून दौऱ्यावर आहे. मी तिथे गेल्यानंतर त्याची माहिती घेईन. आज मी राज्याचा उप... विरोधी पक्षनेता म्हणून तुमच्याशी बोलतो. त्यामुळे मी पूर्ण माहिती घेऊन त्याआधारे स्टेटमेंट करेन. मी गेल्यानंतर सोमवारी त्याबद्दल माहिती घेईन."
अजित पवारांचा दौरा
एखादी सवय लागण्यासाठी किंवा सुटण्यासाठी 21 दिवस लागतात असं म्हटलं जातं. इथे तर अजित पवार महाविकास आघाडी सरकारमध्ये अडीच वर्षे उपमुख्यमंत्री होते. सत्तेत असो वा नसो अजित पवार यांचं काम थांबलेलं नाही. उपमुख्यमंत्री असतानाही ते राज्यभर दौरा करत होते आता विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी राज्यभरातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. आज बारामतीत असताना माध्यमांना प्रतिक्रिया देताना सवयीप्रमाणे स्वत:चा उल्लेख उपमुख्यमंत्री करत होतेच की ही बाब लक्षात आली आणि तातडीने विरोधी पक्षनेता असा उल्लेख केला. परंतु त्यांचा हा गोंधळ कॅमेऱ्यात कैद झाला.
अजून मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळेना, ते नेमके कशाला घाबरतात? अजित पवारांचा सवाल
दरम्यान अजित पवार यांनी यावेळी रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन सरकारवर टीका केली. "एक महिना झाला तरी यांना मंत्रिमंडळाच्या विस्तार करण्यासाठी मुहूर्त मिळेना. का ग्रीन सिग्नल मिळत नाही, एकवाक्यता का होत नाही, ते नेमके कशाला घाबरतात हेच आम्हाला कळेना, असं अजित पवार म्हणाले. "राज्यातील 13 कोटी जनता आशेने बघत आहे. अनेकांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. सचिवांशी बोललो तर ते म्हणतात मंत्री महोदयांच्या रिमार्कची गरज आहे. त्यांचा रिमार्क असल्याशिवाय आम्ही काही करु शकत नाही. त्यामुळे आता कसा कारभार चाललाय ते जनतेन पाहावं, असंही अजित पवार यांनी म्हटलं.
Ajit Pawar : आज "मी राज्याचा उप...", विरोधी पक्षनेता म्हणून बोलतोय : अजित पवार