Bangalore Crime: वादानंतर पत्नीला संपवलं! मृतदेह सुटकेसमध्ये टाकला; थेट जोगेश्वरीसाठी निघाला सातारा रस्त्यातच विष घेतलं अन्.. , राकेश पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला?
Bangalore Crime: पत्नीची हत्या केल्याची माहिती पत्नीच्या आणि आपल्याही आई-वडिलांना दिल्याची माहिती आहे. त्याला स्थानिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.

Bangalore Crime: बंगळुरूमध्ये वाद झाल्यानंतर आपल्या पत्नीची चाकूने वार करून निर्घृण हत्या करुन तिथून पळून आलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राकेश असं आरोपीचं नाव आहे. राकेशने पत्नी गौरीला मारल्यानंतर विष प्राशन करुन स्वत:चं जीवन सुद्धा संपवण्याचा प्रयत्न केला. त्याने पत्नीची हत्या केल्याची माहिती पत्नीच्या आणि आपल्याही आई-वडिलांना दिल्याची माहिती आहे. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.
राकेशने आत्महत्येचा प्रयत्न केला पण...
या घटनेत पोलिसांनी मृत पत्नी गौरी खेडेकरचा मृतदेह बंगळुरू येथील त्यांच्या फ्लॅटमधून ताब्यात घेतला. तर, आरोपी पती राकेश खेडेकर याला साताऱ्यातील शिरवळ येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. शिरवळ येथे राकेशने विष घेत आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली आणि त्यांना राकेश बेशुद्धावस्थेत सापडला. सध्या राकेशची प्रकृती ठीक असून त्याला बंगळुरू येथे नेण्यात येत आहे. तिथे त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई करण्यात येणार आहे.
राकेश खेडेकरचा ताबा बंगळुरू पोलिसांनी घेतला
बंगळूर पत्नी हत्या प्रकरणातील आरोपी राकेश खेडेकरला बंगळुरू पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस बंगळुरू दिशेने रवाना झाले आहेत. ससूनमधील उपचार संपल्यानंतर आरोपी राकेश खेडेकरचा ताबा बंगळुरू पोलिसांनी घेतला. पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी बंगळूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, राकेश खेडेकर आणि गौरी सांबेकर यांचा 2 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. एक- दोन महिन्यापूर्वीच दोघेही बंगळुरू येथे शिफ्ट झाले होते. दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. त्यानंतर काही दिवसापूर्वी बंगळूर पोलिसांना देखील यामध्ये मध्यस्थी करत दोघांची समजूत घातली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाले. हा वाद टोकाला पोहोचला. संतापलेल्या राकेश खेडकरने पत्नी गौरीवर चाकूने वार करत तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले. याची माहिती त्यांनी जोगेश्वरी येथे राहत असलेल्या आपल्या कुटुंबातील लोकांना देखील दिली होती. त्यानंतर तो स्वतःच्या खाजगी वाहनाने बंगळुरू वरून जोगेश्वरीला येत होता. जोगेश्वरीला जात असतानाच त्याने रस्त्यात झुरळ मारण्याचे औषध व फीनेल पिले, त्यामुळे तो शिरवळच्या जवळपास बेशुद्ध झाला. स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तपासणी केली असता हा आरोपी असल्याचे पोलिसांना लक्षात आले. पोलिसांनी सकाळी राकेश खेडेकरला भारती हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल केले होते, त्यानंतर उपचार करून त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती स्थिर असून उपचार झाल्यानंतर त्याला बंगळुरू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
राकेशच्या वडिलांनी काय सांगितलं?
राकेशच्या वडिलांनी माहिती देताना सांगितलं की, राकेशचा फोन आला, त्याने सांगितलं माझ्यासोबत भांडण करत होती. चार दिवसांपूर्वी त्याने तिच्या आई वडिलांना देखील फोन केला होता. तिच्या आईने दोघांना समजवून सांगितलं. गौरीची आई ही माझी सख्खी बहीण आहे. राकेशची आत्या आहे. तिने जोगेश्वरीमध्ये देखील खूप त्रास दिला होता. राकेशने मला दुपारच्या सुमारास फोन केला. रात्री बारा वाजता निघालो आहे असं म्हणाला होता. त्यावेळी त्याने विषाची बाटली सोबत घेतलेली होती. मला त्यांनी सांगितलं की, सगळ्यांना सांगा मी असं केलं आहे, पहिल्यांदा त्याने गौरीला मारल्याचं सांगितलं नव्हतं. त्याने दुसऱ्यांदा फोन केल्यावर सांगितलं. मी तिला मारलं आहे आणि मी पण जीवंत राहणार नाही. त्यानंतर मी त्याला सांगितलं की तू असं काही करू नको. तू इकडे ये आपण पोलिस स्टेशनला जाऊ. आपण पोलिसांना सगळं सांगून तुझ्या हातून असा गुन्हा घडला आहे. त्यावर राकेश ठिक आहे म्हणाला पण, त्याआधीच मी जोगेश्वरीला पोलिस स्टेशनला गेलो. तिथे सगळं सांगितलं, त्यानंतर त्यांनी बंगळुरू पोलिसांना सांगितलं, त्यांना सर्व माहिती राकेशने दिली.
आम्ही लग्नाला विरोध करत होतो. मात्र...
मला असं कधी वाटलं नव्हतं सगळं इथंपर्यंत पोहोचेल. मात्र ते घडलं. त्यांचं रोजच भांडण होत होतं. ती कधीकधी वेड्यासारखी करायची. ती भांडणात अंगावर धावायची, तिने एकदा तिच्या भावाला देखील अंगावर धावून जाऊन मारलं आहे. तीचा स्वभाव असा आहे हे माहिती होतं, म्हणून आम्ही आधीपासून लग्नाला विरोध करत होतो. मात्र, ते एकमेकांना सोडायला तयारचं नव्हते. चार वर्षे आम्ही त्या दोघांच्या लग्नाला विरोध करत होतो. पण ते त्यांच्या निर्णयावरती ठाम होते. आम्ही एकमेकांसोबतच लग्न करू नाहीतर लग्नच करणार नाही असं दोघं म्हणत होते.
ससून रुग्णालयाचे डीन एकनाथ पवार काय म्हणाले?
काल रात्री त्यांना सातारा पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आज सकाळी साधारण आठ वाजता त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी फिनाईल आणि झुरळ मारण्यासाठी वापरतो ते औषध त्यांनी घेतलेलं आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. पोलिसांनी पकडण्याआधीच काही वेळ ते औषध घेतलं होतं. त्याच्या हातात ती बाटली होती अशी माहिती आहे. ते आपल्याकडे ऍडमिट होते. त्यांना गिळण्यासाठी त्रास होत आहे. पाणी, अन्न गिळण्यासाठी त्रास होत आहे. बाकी प्रकृती ठीक आहे, अशी माहिती ससून रुग्णालयाचे डीन एकनाथ पवार यांनी दिली आहे.























