Ajit Pawar on Ashadhi wari 2022 : पालखी मार्गावर पाणी, आरोग्यासह स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अजित पवारांच्या सूचना
देहू आणि आळंदी पालखी सोहळा 2022 पूर्वतयारी संदर्भात पुण्यात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना काही सुचना केल्या आहेत.
Ajit Pawar : पालखी सोहळ्यादरम्यान पालखी मार्ग, पालखी तळ आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. ज्या भाविकांनी कोरोना लशीची दुसरी मात्रा किंवा वर्धक मात्रा घेतली नसेल त्यांना ती घेण्याबाबत आवाहन करण्यात यावं यासाठी लसीकरणाची सुविधा करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. देहू आणि आळंदी पालखी सोहळा 2022 पूर्वतयारी आढावा बैठकीत अजित पवार बोलत होते.
पालखी सोहळ्यादरम्यान अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, त्यांना सोहळा पूर्ण होईपर्यंत कार्यमुक्त करु नये. पंढरपूर येथे फिरते शौचालय आणि टँकरची व्यवस्था वाढवण्यात यावी. शहरात पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक नियोजनासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सूचना कराव्यात. आवश्यक व्यवस्था करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. पालखी सोहळ्यासाठी आवश्यक कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी खर्च करावा आणि प्रस्तावही पाठवावा. सुविधांसाठी पालखी तळ असलेल्या गावांना सुविधेसाठी निधी देण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल असेही अजित पवार म्हणाले.
वाहतूक नियोजनासाठी उपाययोजना कराव्यात
पालखी मार्गावरील वाहतूक नियोजनासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक उपाय करावेत, सर्वांनी मिळून प्रशासनाला सहकार्य करावे. आळंदीला वाहनतळासाठी जागा संपादन करावे , त्यासाठी सहकार्य करण्यात येईल. सोपानदेव पालखी मार्गावरील रस्त्यातील खड्डे जिल्हा परिषदेने त्वरित बुजवावे. पालखी मार्गावरील शासकीय जागेची सुविधेच्यादृष्टेने माहिती घेऊन अशा जागा पालखी सोहळ्यासाठी कायमस्वरुपी आरक्षीत करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, असेही त्यांनी सांगितले. पालखी सोहळा चांगल्या रितीने संपन्न व्हावा यासाठी शासन प्रशासनातर्फे आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी पवार यांनी दिली.
सर्व कामे 10 जूनपर्यंत पूर्ण होणार
पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सादरीकरणाद्वारे करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. अधिकारी आणि सोहळा प्रमुखांच्या संयुक्त पाहणीत आढळलेल्या त्रुटी दूर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वारीमध्ये लसीकरणाची सुविधा करण्यात आली आहे. शौचालय स्वच्छतेचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व कामे 10 जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
विधान भवन पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-2022 पूर्वतयारी आढावा बैठकीत अजित पवार बोलत होते. बैठकीस सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पालखी सोहळ्याचे प्रमुख आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या: