![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sharad Pawar : आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, गोविंद बागेत आवाज घुमला, कार्यकर्त्यांची थेट शरद पवारांसमोर मागणी; विधानसभेला खणाखणी सुरु!
बारामतीमध्ये उमेदवार कोण असणार याचा अंतिम निर्णय हा शरद पवार यांचाच असणार आहे. मात्र, युगेंद्र पवार यांच्या समर्थकांकडून आतापासूनच रान उठवण्यास सुरुवात झाली आहे.
![Sharad Pawar : आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, गोविंद बागेत आवाज घुमला, कार्यकर्त्यांची थेट शरद पवारांसमोर मागणी; विधानसभेला खणाखणी सुरु! We want a change of Dada of Baramati Govind Bagh raised a voice workers demand directly in front of Sharad Pawar ajit pawar supriya sule rohit pawar baramati vidhansabha Sharad Pawar : आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, गोविंद बागेत आवाज घुमला, कार्यकर्त्यांची थेट शरद पवारांसमोर मागणी; विधानसभेला खणाखणी सुरु!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/416d0359310accdebdd8d74eabbe2eed1718081445629736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बारामती : बारामती लोकसभा (Baramati Loksabha) निवडणुकीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय झाल्यानंतर अजित पवार गट बॅकफूटवर आहे. त्यामुळे बारामतीमध्ये आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा अजित पवारांविरोधात आवाज उठण्यास सुरुवात झाली आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आज (11 जून) बारामती दौऱ्यावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे यांच्यासाठी युगेंद्र पवार आणि आमदार रोहित पवार यांनी काका अजित पवारांविरोधात शड्डू ठोकला आहे.
युगेंद्र पवारांसाठी कार्यकर्त्यांनी गोविंद बागेत शरद पवारांची भेट घेतली
युगेंद्र पवार यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी गोविंद बागेत शरद पवारांची भेट घेतली. बारामतीमध्ये शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी केली. यावेळी आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, अशी थेट साद शरद पवारांना युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांनी घातली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा सामना होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.
अजित पवार यांना आव्हान निर्माण झालं आहे का?
बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभेच्या रिंगणात होत्या. मात्र, सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांना धोबीपछाड देत विजय खेचून आणला. त्यामुळे अजित पवार गट बारामतीमध्ये बॅकफूटवर आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य बारामती विधानसभेमधूनच सुप्रिया सुळे यांना मिळाले होते. त्यामुळे अजित पवार यांना आव्हान निर्माण झालं आहे का? अशीही चर्चा रंगली होती.
बारामतीमध्ये उमेदवार कोण असणार याचा अंतिम निर्णय हा शरद पवार यांचाच असणार आहे. मात्र, युगेंद्र पवार यांच्या समर्थकांकडून आतापासूनच रान उठवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांमध्ये बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार सामना निश्चित रंगणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)