सोयाबीन, गहू, तांदूळ, कापूस, शरद पवारांनी शेतातलं सगळंच काढलं; मोदींच्या 10 वर्षातलं दरपत्रकच मांडलं
Sharad Pawar: लोकसभेची निवडणूक आली, आणि या निवडणुकीमध्ये आम्ही लोकांनी एक आघाडी केली. देशाचे, राज्याचे अनेक पक्ष एकत्र केले आणि एकत्र करून एक चांगला पर्याय देशामध्ये कसा देता येईल?
पुणे : राज्यातील 48 जागांवर होत असलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी (Election) महाविकास आघाडी व महायुतीमध्ये घमासान सुरू आहे. त्यातच, यंदा प्रथमच बारामती लोकसभा मतदासंघात पवार कुटुंबातच फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. बारामतीमधून सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे (Supriya Sule) असा सामना होत असून प्रचारासाठी दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. विशेष म्हणजे अजित पवार यांच्यासाठी राज्यातील दिग्गज नेत्यांची फौज बारामतीत (Baramati) प्रचार करत आहे. तर, शरद पवार हेही लेकीसाठी मतदारसंघ पिंजून काढत आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने निरा शिवतकर, पुरंदर येथे आयोजित जाहीर सभेतून शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. मोदींच्या गत 10 वर्षातीला कारभारामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं पवारांनी म्हटलं. तसेच, आपल्या 10 वर्षांच्या कृषीमंत्रीपदाच्या व आत्ताच्या 10 वर्षातील शेती पिकांच्या दराची माहितीच त्यांनी जाहीर सभेतून दिली.
लोकसभेची निवडणूक आली, आणि या निवडणुकीमध्ये आम्ही लोकांनी एक आघाडी केली. देशाचे, राज्याचे अनेक पक्ष एकत्र केले आणि एकत्र करून एक चांगला पर्याय देशामध्ये कसा देता येईल? चांगला पर्याय राज्यामध्ये कसा देता येईल? याचा विचार केला आणि त्या निमित्ताने ही निवडणूक आम्ही लढवत आहोत. या निवडणुकीमध्ये आघाडीच्या वतीने सुप्रिया सुळे यांची निवड आम्ही केली. त्यांची खूण काय हे आपल्याला सांगितलं. तुतारी वाजवणारा माणूस, त्याच्या समोरचं बटण दाबायचं आणि मोठ्या मतांनी त्यांना निवडून द्यायचं. त्यांना नुसतं निवडून द्यायचं नाही, तर त्यांना निवडून देऊन मोदींना मदत करणारा एक माणूस कमी करायचा, अशा शब्दात शरद पवारांनी मोदींना लक्ष्य करत पुरंदरकरांना आवाहन केलं. यावेळी, त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारच्या धोरणावरही भाष्य केलं.
आम्ही लोकांनी पार्लमेंटमधील काही गोष्टी बाहेर काढल्या. त्या गोष्टी काय होत्या? तुम्ही शेतकऱ्यांच्या मालाची किंमत कशी काढणार? त्या लोकांनी माझ्यावर टीका केली की, शरद पवार नेहमी महागाईला निमंत्रण देतात. हे काही महागाईला निमंत्रण नाही. संसार शेतकऱ्याला जर चालवायचा असेल तर त्याच्या घामाची किंमत त्याला द्यायला हवी. त्यासाठी आम्हा लोकांचा आग्रह आहे. मी तुमच्या माहितीसाठी काही आकडे देतो, असे म्हणत शरद पवारांनी 10 वर्षांची तुलनात्मक आकडेवारीच दिली.
शेतमालाची तुलनात्मक आकडेवारीच दिली
10 वर्षे आम्हा लोकांच्या हातामध्ये देशाचा आणि शेतीचा कारभार माझ्या हातामध्ये होता. 10 वर्षे मोदी साहेब आल्यानंतर भाजपाच्या हातात तो शेतीचा कारभार आज या ठिकाणी आहे. माझ्या हातामध्ये ज्या काळात शेतीचा कारभार होता, त्या 10 वर्षांमध्ये भाताचा दर 138 रुपयांनी आम्ही वाढवला, आणि मोदींच्या 10 वर्षांच्या काळामध्ये हे दर 66 रुपयांनी वाढवले. माझ्या हातात सत्ता असताना गव्हाचे दर 122 रुपयांनी वाढवला, तर मोदी साहेबांच्या काळामध्ये 62 रुपयांनी वाढवला. उसाची किंमत माझ्या हातामध्ये काम असताना 187 रुपयांनी वाढवला, तर मोदी साहेबांच्या काळात 50 रुपयांनी वाढवला. सोयाबीनचा भाव माझ्या काळात 175 रुपये होता, तर भाजपाच्या या 10 वर्षांच्या काळात 79 रुपये आहे. कापसाचा भाव माझ्या हातात असताना 114 रुपयांनी वाढला आणि भाजपच्या काळात तो 78 रुपयांनी वाढला. मक्याची किंमत माझ्या काळामध्ये 159 रुपयांनी वाढला, तर भाजपाच्या 10 वर्षात ते 59 रुपयांवर झाला. हरभऱ्याची किंमत माझ्या काळामध्ये 121 रुपयांनी वाढली, तर भाजपाच्या 10 वर्षांच्या काळात 75 रुपयांनी वाढली. तुरीचा भाव माझ्या काळामध्ये 216 रुपयांनी वाढला, तर भाजपच्या 10 वर्षात 62 रुपयांनी वाढला. हे आकडे कशासाठी मी देतोय? हे आकडे एवढ्यासाठी देतोय, की या देशातील 70 टक्के वर्ग जो शेती करतो, त्याला त्याच्या घामाची, कष्टाची किंमत ही देण्याची आजच्या राज्यकर्त्यांची तयारी नाही, असे म्हणत पवारांनी आकडेवारीच मांडली.
सुप्रिया सुळेंचा देशात दुसरा नंबर
देशातील एवढ्या लोकांना जर न्याय द्यायचा असेल, तर या लोकांचा मतांचा अधिकार जो आहे, तो आम्हाला न्याय देत नाही त्याच्याविरुद्ध वापरणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. म्हणून त्या दृष्टीने विचार करणं ही आजची गरज आहे. पुरंदर तालुका असो, बारामती तालुका असो या कुठल्याही भागातून आपण असाल आणि जे नाही त्यांना हा निरोप द्या की पुन्हा एकदा या देशाची स्थिती बदलायची असेल, शेतकऱ्यांचे जीवन सुधारायचे असेल तर मोदी साहेबांच्या हातातील हा कारभार काढून घेणे, हे काम उद्याच्या निवडणुकीत आपल्याला करायचे आहे आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. तीनदा तुम्ही सुप्रियाला निवडून दिलं. एकच गोष्ट फक्त सांगतो की देशामध्ये 543 खासदार असतात त्या सर्व खासदारांमध्ये सर्वात जास्त हजेरी, सगळ्यात जास्त प्रश्न, सगळ्यात जास्त बिल आणि सगळ्यात जास्त काम हे करणाऱ्यांची यादी ज्यावेळी पार्लमेंटच्या लोकांची झाली, त्यामध्ये तुमच्या खासदाराचा नंबर दुसरा लागला, सबंध हिंदुस्थानामध्ये. म्हणून जे काम करतात, त्यांना प्रोत्साहित करणे ही जबाबदारी आपली आहे, ते काम तुम्ही करा. बाकीचे जे प्रश्न आहेत, म्हणजे शेती, कारखान्याचे असतील, बेकारीचे असतील, एकदा ही निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर त्या कामात आपण सगळेजण लक्ष घालू आणि त्यातून मार्ग काढू, असेही पवार यांनी म्हटले.