Raj Thackeray Pune : राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर; मनसेतील अंतर्गत वाद सोडवणार का?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या जनसंपर्क कार्यालयाचं उदघाटन करणार आहे. दुसऱ्या दिवशी सहजीवन व्याख्यानमालेत सहभागी होणार आहे.
Raj Thackeray Pune : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आजपासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या जनसंपर्क (Pune) कार्यालयाचं उदघाटन करणार आहे. दुसऱ्या दिवशी (MNS) सहजीवन व्याख्यानमालेत सहभागी होणार आहे. याशिवाय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे बैठक घेणार आहेत. राज ठाकरे मागील अनेक दिवसांपासून पक्षबांधणीसाठी महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. कोकण त्यानंतर विदर्भ आणि आता ते तीन दिवस पुण्यात असणार आहे.
राज ठाकरे आज (27 डिसेंबर) पुण्यात तीन पदाधिकाऱ्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करणार आहे. त्यासोबतच पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. पुण्यातील मनसेत काही दिवसांपासून अंतर्गत वादावादी सुरु आहे. त्यामुळे फूट पडली आहे. त्यांच्याबाबत राज ठाकरे नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
वसंत मोरे यांची नाराजी दूर होणार का?
पुणे शहरातील मनसेचे अंतर्गत वाद सध्या चांगलेच चव्हाट्यावर आले आहेत. त्यामुळे मनसेत दोन गट निर्माण झाले आहे. पुण्यातील मनसेचे फायर ब्रॅंड नेते वसंत मोरे मागील काही दिवसांपासून मनसेच्या निर्णयावर नाराज असल्याचं चित्र आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी दोन वेळा वसंत मोरे यांना राज ठाकरेंनी चर्चेसाठी बोलवून घेतलं होतं. मात्र नाराजी कायम होती. त्यानंतर मनसेचे युवानेते अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी तातडीने वसंत मोरे यांना भेटीसाठी बोलवून घेतलं होतं. या दोन दिवसीय दौऱ्यात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या जनसंपर्क कार्यलयाचं उद्घाटन करणार आहेत. शिवाय अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक आणि चर्चा करणार आहे. यात मात्र वसंत मोरे आणि राज ठाकरेंची भेट होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
पत्राद्वारे नेत्यांना तंबी
सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाट्टेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स याच्याने हे सगळे शेफारले आहेत. इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही, असं पत्रक सोशल मीडियावर शेअर करत राज ठाकरे यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वॉर्निंग दिली आहे. ही समज नाही तर अंतिम ताकीद आहे याची नोंद घ्या, असं देखील त्यांनी पत्रात लिहिलं आहे.