Pune News : चांदणी चौकातील वाहतूक कोंडीत CM अडकले! प्रशासन खडबडून जागे, घेतला 'हा' निर्णय
Pune News : गेली दोन वर्षे जी वाहतूक कोंडी प्रशासनाला दिसली नाही ती मुख्यमंत्री अडकताच जाणवली.तासाभराच्या पाहणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अवजड वाहतुकीबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला.
![Pune News : चांदणी चौकातील वाहतूक कोंडीत CM अडकले! प्रशासन खडबडून जागे, घेतला 'हा' निर्णय Pune News CM Eknath Shinde stuck in Chandni Chowk traffic jam administration woke up and took this decision Pune News : चांदणी चौकातील वाहतूक कोंडीत CM अडकले! प्रशासन खडबडून जागे, घेतला 'हा' निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/03/7bd771949edcd7963e4eb671d5f43143_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुण्यातील चांदणी चौकामध्ये (Pune Chandani Chowk) होणाऱ्या वाहतूक कोंडीचा (Traffic) सामना दस्तुरखुद्द काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) अनुभवला. गेल्या दोन वर्षांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडी होते. मुख्यमंत्र्याचा ताफा अडकल्यानंतर पुणेकरांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना गाठत या कोंडीतून सुटका कधी करणार असा प्रश्न विचारला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला जागं केलं अन् अख्ख प्रशासन चांदणी चौकात पोहचलं. पण हे कधी घडलं, जेव्हा दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांचा ताफा या वाहतूक कोंडीत अडकला. अन् त्यावेळी वाहतूक पोलिसांनी चांगलीच चपळाई दाखवली आणि अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत बाहेर काढला. पण वाहतूक पोलीस हीच चपळाई पुणेकरांसाठी दाखवताना दिसत नाहीत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्याची चांदणी चौकात ताफा अडकल्यानंतर पुणेकरांनी त्यांना गाठलं. गेल्या दोन वर्षांच्या कोंडीबाबतची माहिती दिली. तुमची तर अवघ्या पंधरा मिनिटांत सुटका झाली पण आमचं काय? आम्ही या वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास कधी घेणार असा प्रश्न त्यांना विचारला. मग तिथूनच मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या प्रश्न तातडीनं निकाली लावा, अशा सूचना दिल्या. मग काय गेली दोन वर्षे जी वाहतूक कोंडी प्रशासनाला दिसली नाही ती मुख्यमंत्री अडकताच जाणवली. जिल्हाधिकारी, पुणे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त, पुणे पालिका आयुक्त, महामार्ग पोलीस प्रशासन अशी अख्खी जंत्री तिथं पोहचली. तासाभराच्या पाहणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अवजड वाहतुकीबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला.
चांदणी चौकात सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 6 ते 9 या वेळेत अवजड वाहतूक बंद
सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 6 ते 9 या वेळेत अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय झाला. सोमवारी हा आदेश काढला जाईल तो 30 सप्टेंबरपर्यंत लागू असेल. त्यावेळी वाहतूक कोंडी सुटते का हे पाहून पुढील निर्णय घेतला जाईल. यावेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा वाहतूक कोंडीत कसा अडकला हे स्पष्ट करण्यात आलं.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, चांदणी चौक हा माझ्या मतदारसंघात आहे हा योगायोग आहे. मुळात हा प्रश्न मुंबई ते बेंगलोर प्रवास करणाऱ्या प्रत्येकाशी निगडित आहे. तो सुटावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जागा हस्तांतर करण्यात अडचणी आहेत, त्या हस्तांतर झाल्या की वाहतूक कोंडी फोडण्यात यश येईल. यात कंत्राटदारांची चूक आहे, असं म्हणणं योग्य ठरणार नाही. काम संथ गतीने होतंय, असं ही नाही. हे काम केंद्रांतर्गत होत आहे, त्यामुळेच 2 सप्टेंबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुण्यात येतील तेव्हा ते याची माहिती घेणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)