(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde In Pune: पुणेकरांनी अडवला मुख्यमंत्र्यांचा ताफा; चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचं गाऱ्हाणं थेट मुख्यमंत्र्यांकडे
पुणेकरांनी थेट मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला आणि वाहतूक कोंडीचं गाऱ्हाणं मांडलं. स्थानिकांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदनदेखील दिले.
Eknath Shinde In Pune: पुण्यातील चांदणी चौकात पुणेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला. काल रात्री (2६ऑगस्ट) ही घटना घडली. पुणेकरांना रोज चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेक नागरीकांचा वेळ वाया जातो. त्यामुळे पुणेकरांनी थेट मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला आणि वाहतूक कोंडीचं गाऱ्हाणं मांडलं. स्थानिकांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदनदेखील दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्याची चांदणी चौकातील हायवेवरुन साताऱ्याला जात होते. त्यावेळी चांदणी चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफादेखील वाहतूक कोंडीत अडकला. शहरात सर्व ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. अनेकांना याचा त्रास होत आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडीवर मार्ग काढा. काहीतरी ठोस नियोजन करा. या मार्गावर तासंतास वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असतात, यावर तोडगा काढा,अशी मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुंबई-बॅंगलोर हायवेवर रोज अनेकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यात सगळ्यात महत्वाचा टप्पा जो पुण्यातील चांदणी चौकाकडे येतो त्या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा असतात. त्यामुळे अनेक नागरीक गेले काही महिने या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आहेत. यापुर्वी देखील पुणेकरांनी पुणे प्रशासनाकडे या वाहतूक कोंडीचं गाऱ्हाणं मांडलं होतं. मात्र याकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याने पुणेकरांनी थेट मुख्यमंत्र्यांना गाठलं आहे.
पुणे शहरातील चांदणी चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काम सुरू आहे. त्यामुळे ही वाहतूक कोंडी होत आहे. मुख्यमंत्र्यांनी या वाहतूक कोंडीवरत तोडगा काढण्याचा आदेश दिला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे अधिकारी आज या मार्गाची पाहणी करणार आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने पुणेकरांची महत्वाची म्हणजेच वाहतूक कोंडीची समस्या कितपत सुटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सुप्रिया सुळेंचं थेट नितीन गडकरींकडे गाऱ्हाणं
यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्याकडे पुणेकरांसाठी खास मागणी केली होती. पुणेकरांच्या वाहतूक समस्येवर भाष्य केलं होतं. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गानंतर आता पुणे-सातारा महामार्गावर नागरीकांना येणाऱ्या वाहतूक कोंडीसारख्या समस्यांवर तोडगा काढा, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यासंदर्भात त्यांनी ट्विटदेखील केलं होतं. पुण्यात मेट्रोचं काम सुरु असल्याने अनेक परिसरात वाहतूक कोंडी होते. या वर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झाल्याने रोडवर खड्यांचं प्रमाण देखील वाढलं आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी नितीन गडकरींकडे ही मागणी केली होती.