Parth Pawar : अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार पुण्यातील अट्टल गुन्हेगाराच्या भेटीला; राजकीय वर्तुळात खळबळ
Parth Pawar : गजा मारणे कोथरूड परिसरात शास्त्रीनगर परिसरात आल्यानंतर गुन्हेगारीची मालिका सुरूच आहे. अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात गजा मारणेला अटक झाली. तो 3 वर्ष येरवडा कारागृहात होता.
पुणे : पुण्यात (Pune Crime) भुरट्या गुंडासह अट्टल गुंडगिरीचा कळस सुरु असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गजा मारणेची (Gaja Marne) पत्नी जयश्री मारणे राष्ट्रवादी काँग्रेसमधे आहे. दीड वर्षांपूर्वी जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश केला होता. यावेळी जयश्री मारणेंचा नवरा आणि कुख्यात गुंड गजानन मारणेनं पुष्पगुच्छ देऊन पार्थ पवार आणि इतर नेत्यांचे स्वागत केले.
भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ
जयश्री मारणे या मनसेकडून नगरसेविका राहिलेल्या आहेत. सध्या अजित पवार गटाकडून पुण्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी पार्थ पवार, माजी नगरसेवक बंडू केमसे, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक दीपक मानकर हे कोथरूडमधे आले असता त्यांनी जयश्री मारणेंच्या घरी भेट दिली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गजा मारणे कुख्यात गुंड, 3 वर्ष येरवडा कारागृहात
गजा मारणे कोथरूड परिसरात शास्त्रीनगर परिसरात आल्यानंतर गुन्हेगारीची मालिका सुरूच आहे. अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात गजा मारणेला अटक झाली. तो 3 वर्ष येरवडा कारागृहात होता. तो आता मारणे टोळीचा म्होरक्या आहे. या टोळीवर 23 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गजा मारणेवर सहापेक्षा अधिक खुनाचे गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी पुण्यातील व्यावसायिकाला 20 कोटी रुपयांची खंडणी मागणी केल्याप्रकरणात कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
अजित पवारांकडून पुणे पोलिसांना थेट कानपिचक्या
दुसरीकडे, काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी पुण्यातील गुंडगिरीवरून पोलिसांना कानपिचक्या दिल्या होत्या. कोण कुणाला गोळ्या घालतो, पण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हेगारांना पकडलं. ससूनमध्ये जे घडलं त्यात कुणाचाच मुलाहिजा बाळगणाऱ नाही, असं गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, कोणी कितीही मोठा असो, कितीही मोठ्या बापाचा असो त्याला सोडणार नाही. कुठे काही कानावर आलं आणि कोणी काही चुकलं तर देवेंद्रजी सस्पेंड करत नाहीत तर बडतर्फ करतात.
पोलिसांचा वचक असला पाहिजे
त्यांनी सांगितले की, गुन्हेगारांचं उदात्तीकरण थांबलं पाहिजे, चित्रपटांचा परिणाम जाणवत आहे. पुष्पा नाम है मेरा, फुल नही फायर हुं, काय चाललंय? जेलमध्ये असलेल्या कैद्यांचे बाहेर वाढदिवस साजरे होतात. पोलिसांची इभ्रत राहिली पाहिजे. गुन्हेगारांचे होर्डिंग लागतात कसे? पोलिसिंगची पद्धत बदलली पाहिजे. पोलिसांचे गुन्हेगारीवर नियंत्रण राहिलं पाहिजे. पोलिस दलातील भरतीचे निकष बदलण्याची गरज आहे, उंचीची मर्यादा वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे ते म्हणाले. पोलिसांच्या शरीरयष्टीवर लक्ष देण्याची गरज आहे, एक महिला पोलिस शरीराने अगदीच किरकोळ असल्याचं निदर्शनास आलं. चोराला कसं पकडणार असं तिला विचारलं तर ब्रेकिंग न्यूज झाली, असेही अजित पवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या